पुणे पोलीस अन् बिर्याणी : “ त्या ऑडिओ क्लिपची चौकशी झाली पाहिजे; हे माझ्या विरुद्धचं षडयंत्र आहे”

पुण्याच्या पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी स्पष्ट केली भूमिका; या विरोधात सायबर क्राईममध्ये गुन्हा दाखल करणार असल्याचंही सांगितलं आहे.

“ ऑडिओ क्लिपची चौकशी झाली पाहिजे. चौकशी होणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतरच जे सत्य आहे ते समोर येईल. गृहमंत्र्यांनी याबाबत जे काही सांगितलं आहे, त्यावरून सर्व काही स्पष्ट होईल. हे माझ्या विरुद्धचं षडयंत्र आहे.” असं म्हणत पुण्याच्या पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी सध्या पुणे पोलीस दलाबाबत चर्चेचा विषय ठरत असलेल्या बिर्याणी प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

पुणे पोलीस दलात सध्या एका ऑडिओ क्लिपमुळे खळबळ माजली आहे. यामध्ये पुणे पोलीस दलातील महिला अधिकारी कर्मचाऱ्याला जेवणाची ऑर्डर देताना हॉटेलवाल्याला बिलाचे पैसे देण्याची काय गरज आहे? अशी विचारणा करताना दिसत आहे. तर, या संभाषणातील महिला अधिकरी म्हणजे पुण्याच्या पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे असल्याचे समोर आल्यानंतर यावर स्वतः पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी एबीपी माझाशी बोलताना आपली बाजू मांडली आहे.

“बिर्याणीसाठी पैसे कशाला द्यायचे?”; ‘त्या’ ऑडिओ क्लिपमुळे पुणे पोलीस दलात खळबळ

पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे म्हणाल्या की, “ माझ्या झोनमध्ये काही कर्मचारी होते जे बऱ्याच वर्षांपासून ठाण मांडून बसलेले होते. त्यामुळे त्यांचे काही आर्थिक हितसंबंध जुडलेले होते. हप्तेगिरी तिथे चालत होती. माझ्या अगोदर जे अधिकारी काम करत होते, ते देखील यामध्ये सहभागी आहेत. बदल्यांच्या काळातच ही मॉर्फ क्लिप बाहेर का आणली गेली? ही संपूर्ण क्लिप माझी नाही. माझ्या विविध संभाषणांमधील वाक्य यामध्ये जोडलेले आहेत. तसेच, यातील काही भाग जो आहे तो मी बोलली नाही. ही संपूर्णत: मॉर्फ क्लिप आहे, याबाबच चौकशी झाली पाहिचे आणि मी या विरोधात सायबर क्राईममध्ये गुन्हा दाखल करणार आहे.”

तसेच, “ महेश साळुंके म्हणून जे कर्मचारी माझ्या कार्यालयात होते, त्यांच्यासोबत जे दुसरे कर्मचारी होते ज्यांना १२ वर्षे झाली होते, त्यांच्याबाबत मी डिफॉल्ट रिपोर्ट पाठवला होता, जे तिथे हप्तेखोरी करत होते. हे सगळं मी येण्या अगोदर व्यवस्थित सुरू होतं आणि मी आल्यानंतर ते सगळं काही बंद झालं. त्यामुळे या सर्वांचे हीतसंबंध फार दुखावले गेले आहेत आणि म्हणून माझी इथून उचलबांगडी व्हावी व त्यांचं जे अगोदर सुरू होतं ते सुरू रहावं यासाठी केलेला हा कट आहे. यामध्ये काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा देखील त्यांना पाठींबा आहे. त्यांच्याच आदेशाने व निदर्शनात हे सुरू आहे. माझ्या करिअरला नुकसान व्हावं, म्हणून हे केलं गेलं आहे.” असंही यावेळी पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी सांगितलं आहे.

ही ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली असून पुणे पोलीस दलात एकच चर्चा रंगली आहे. दरम्यान राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीदेखील या ऑडिओ क्लिपची दखल घेतली आहे. दिलीप वळसे पाटील यांनी याप्रकरणी आयुक्तांकडून अहवाल मागवला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pune police and biryani that audio clip should be investigated this is a conspiracy against me msr

फोटो गॅलरी