पिंपरी- चिंचवड: बहिणीच्या प्रियकराची हत्येची सुपारी देऊन हत्येचा प्रयत्न करणाऱ्यासह तिघांना गुंडा विरोधी पथकाने अटक केली आहे. हत्येची दहा लाखांची सुपारी देऊन तरुणीचा भाऊ गोव्याला आणि चुलता कोल्हापूरला देवदर्शनासाठी निघून गेला. या प्रकरणात सुपारी किल्लर आकाश भोकसे यांच्यासह तरुणीचा भाऊ अभिजित केदारी आणि चुलता नितीन केदारी ला अटक केली आहे. विकास केदारी हा जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याच्या मानेत गोळी शिरली आहे. याबाबत किरण बाळासाहेब केदारी यांनी तक्रार दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास केदारी आणि अभिजित केदारीच्या बहिणीचे प्रेमसंबंध होते. अनेकदा समजावूनही विकास तिच्यापासून दूर होत नव्हता. तो प्रेयसीला सोडायला तयार नव्हता. अखेर चित्रपटात साजेशी हत्येची योजना (प्लॅन) करण्यात आली. अभिजित आणि नितीन यांनी सराईत गुन्हेगार आकाश भोकसे ला विकास च्या हत्येची दहा लाखांची सुपारी दिली. त्याला ठार मारण्याचा प्लॅन ठरला. हत्येची सुपारी देऊन भाऊ अभिजित गोव्याला आणि चुलता नितीन केदारी हा कोल्हापूरला देवदर्शनाला निघून गेला.
११ नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहा च्या सुमारास पुणे- मुंबई द्रुतगती मार्गाजवळ काही अंतरावरून विकासच्या दिशेने जीवे मारण्याच्या उद्देशाने पिस्तूलातून गोळी झाडली. गोळी विकासच्या मानेत शिरली सुदैवाने तो थोडक्यात बचावला आहे. विकासवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याच्या शरीराचा खालील भाग काम करेनासा झाला आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. अभिजित, नितीन आणि आकाश यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिरगाव पोलीस आरोपींचा शोध घेत होते. अखेर गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांच्या टीमने आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून बेड्या ठोकल्या आहेत.
