पुणे: मोबाइल उपयोजन (ॲप) गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या डाॅक्टरसह मध्यस्थाला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. शिरर तालुक्यातील पाचंगे वस्तीतील एका रुग्णालयात ही कारवाई करण्यात आली.

डाॅ. आकाश सुभाष मालगुंडे (वय ३५), नरेंद्र बाळासाहेब ठाकरे (वय ५०) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध वाघोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वाघोलीतील नरेंद्र ठाकरे हा महिलांची गर्भलिंग निदान चाचणी करत आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट सातचे पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, ओैध रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डाॅ. नागनाथ येम्पल्ले, शिरुर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. सचिन धस यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले.

पोलिसांनी एका महिलेच्या मदतीने खातरजमा केली. मध्यस्थ नरेंद्र ठाकरे याने महिलेला शिरुर तालुक्यातील पाचंगे वस्ती येथील लाईफ केअर रुग्णालयाचा पत्ता दिला. बुधवारी सकाळी पंचासोबत पोलीस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक पुणे-नगर रस्त्यावरील कारेगाव परिसरात पोहाेचले.

ठाकरे तेथे मोटार घेऊन थांबला होता. महिला आणि तिच्या पतीला मोटारीतून त्याने पाचंगे वस्ती, डोकसावंगी येथील लाईफ केअर रुग्णालयात नेले. त्यानंतर डाॅ. आकाश मालगुंडे याने महिलेची मोबाइल ॲपचा वापर करुन तपासणी केली. या ॲपच्या माध्यमातून त्याने महिलेची गर्भलिंग निदान चाचणी केल्याचे उघड झाल्यानंतर डाॅ. मालगुंडे आणि मध्यस्थ ठाकरे यांना ताब्यात घेण्यात आले.

दहा ते वीस हजारात गर्भलिंग निदान चाचणी

पोलिसांनी डाॅ. मालगुडे, ठाकरे यांना ताब्यात घेतले. मोटारीत गर्भलिंग निदान चाचणी करण्याचे साहित्य, गर्भपात करण्यासाठी लागणारी ओैषधे सापडली. दहा ते वीस हजार रुपयात आरोपी गर्भलिंग निदान चाचणी करत असल्याची माहिती चौकशी मिळाली. गर्भलिंग चाचणी करणे हा कायद्याने गुन्हा आहे. असे प्रकार आढळून आल्यास त्वरीत आरोग्य विभाग किंवा पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, उपायुक्त डाॅ. निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक डाॅ. भगवान पवार यांनी या कारवाईसाठी पोलिसांना मार्गदर्शन केले.