पुणे : प्रतिस्पर्धी टोळीकडून हल्ला होण्याची भीती असल्याने देशी बनावटीची पिस्तुले बाळगणाऱ्या सराइतांना खंडणी विरोधी पथकाने गजाआड केले. त्यांच्याकडून चार पिस्तुले, तसेच पाच काडतुसे जप्त करण्यात आली.
रोहित दुर्गेश धर्माधिकारी (वय २४, रा. प्रियदर्शननगर, जुनी सांगवी), अभिषेक राजु टेंकल (वय २३, रा. विणूकृपानंगर, शिवाजीनगर रेल्वे स्थानक) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. धर्माधिकारी आणि टेंकल हे साइत आहेत. धर्माधिकारीविरुद्ध पाच गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध भोसरी पोलीस ठाण्यात विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. टेेकल याच्याविरुद्ध सांगवी पोलीस ठाण्यात बेकायदा शस्त्र बाळगणे, शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी गुन्हे दाखल झाले होते. धर्माधिकारी याची सांगवी परिसरात एकाशी भांडणे झाली होती. प्रतिस्पर्धी टाेळीकडून हल्ला हाेण्याची भीती त्याला वाटत होती. त्याने मध्यस्थामार्फत देशी बनावटीची पिस्तुले खरेदी केली हाेती. खंडणी विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी सुरेंद्र जगदाळे आणि प्रशांत शिंदे यांना याबाबतची माहिती मिळाली.
धर्माधिकारी हा शिवाजीनगर भागातील श्री संत ज्ञानेश्वर पादुका चौकात येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी जगदाळे,आणि शिंदे यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून धर्मधािकारी आणि टेंकल यांना पकडले. त्यांच्याकडून देशी बनावटीची चार पिस्तुले, पाच काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त करण्यत आला. अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे,सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राम राजमाने, उपनिरीक्षक गौरव देव, सुरेंद्र जगदाळे,रवींद्र रोकडे, दिलीप गोरे, अनिल कुसाळकर, अमोल घावटे, अजिनाथ येडे, पवन भोसले, रोहिल शेख, अमोल राऊत, प्रशांत शिंदे, आझाद पाटील यांनी ही कामगिरी केली.
उमराटीतून पिस्तुलांची खरेदी
पुणे शहरातील गुंड टोळ्यांना माध्य प्रदेश-महाराष्ट्र सीमेवर असलेल्या उमराटी गावातून पिस्तुलांचा पुरवठा होत असल्याचे उघडकीस आले होते. मध्य प्रदेशातील उमराटी गावात पुणे पोलिसांनी छापा टाकून पिस्तुले जप्त केली होती. देशी बनावटीची पिस्तुले तयार करुन पुण्याती गुंड टोळ्यांना मध्यस्थांमार्फत पुरवठा करणाऱ्या कारागिरांना अटक केली होती. या कारवाईनंतर उमराटी गावात पुन्हा पिस्तुले तयार होत असल्याचे उघडकीस आले आहे. आरोपी धर्माधिकारी उमराटीतून पिस्तुले खरेदी करुन विक्रीस आणली होती. खंडणी विरोधी पथकाने शिवाजीनगर भागातून धर्माधिकारीसह साथीदारांना अटक केली. त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.
