पुणे : अमली पदार्थांची तस्करी आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध पुणे पोलिसांनी कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबविली आहे. गेल्या सात महिन्यांत अमली पदार्थ विक्री प्रकरणात २८३ जणांना अटक करण्यात आली आहे. अमली पदार्थांच्या विक्रीप्रकरणी शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत १६२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शिक्षणाचे माहेरघर, आयटी सिटी अशी ओळख असलेल्या पुणे शहर परिसरात मोठ्या संख्येने विद्यार्थी, आयटी क्षेत्रातील तरुण स्थायिक झाले आहेत. रोजगाराच्या शोधात परगाव, परप्रांतातून स्थायिक होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. शहरात अमली पदार्थ विक्री, तसेच तस्करीचे प्रकार वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश शहरातील सर्व पोलीस ठाण्यांतील अधिकाऱ्यांना दिले आहेत. अमली पदार्थ विक्रेत्यांना अमली पदार्थ पुरविणाऱ्या तस्करांचा पकडण्याचे आदेश देण्यात आले आहे. अमली पदार्थ विक्रीच्या मूळापर्यंत जाऊन तपास करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अमली पदार्थ पुरवठादारापर्यंत पोहोचणे, अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्यांचे समुपदेशन, तरुणांमध्ये जागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करणे ही त्रिसूत्री राबविण्यात येत आहे.

गेल्या सात महिन्यांत अमली पदार्थ विक्री प्रकरणात १६२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जुलै महिन्यात अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांविरुद्ध १३८ गुन्हे दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहआयुक्त संजय दराडे, अतिरिक्त आयुक्त तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ तस्करांविरुद्ध मोहीम राबविण्यात येत आहे.

‘व्यसनाधीनांकडे गुन्हेगार म्हणून बघू नका’

‘अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्यांकडे गुन्हेगार म्हणून पाहू नये. त्यांचे समुपदेश, उपचार करून पुनर्ववसन करण्याची संधी देणे गरजेचे आहे. नांदेड सिटी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात एकाने व्यसन सोडण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी न्यायालयात अहवाल सादर केला. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने तरुणाची व्यसनमुक्ती केंद्रात रवानगी करण्यात आली. मासिक प्रगती अहवाल, उपचारातील प्रगती याबाबची माहिती न्यायालयात सादर करावी,’ असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

‘कॅम्पस कनेक्ट’ उपक्रम

अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुणााईला सोडविण्यासाठी पोलिसांच्या वतीने जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या सात महिन्यांत शाळा, महाविद्यालयांत ‘कॅम्पस कनेक्ट’ या उपक्रमातंर्गत १०४ जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

अमली पदार्थ तस्करी, विक्रीप्रकरणी पोलिासांनी कडक कारवाईचे धोरण स्वीकारले आहे. यापुढील काळात ही मोहीम सुरू राहणार आहे. अमली पदार्थांचे व्यसन करणाऱ्यांकडे गुन्हेगार म्हणून पाहू नये. समुपदेशन, व्यसनमुक्ती, पुनर्वसनाची संधी देणे आवश्यक आहे. – अमितेशकुमार, पोलीस आयुक्त