पिंपरी : उत्तरप्रदेश पोलीस असल्याचे भासवून पाच जणांनी मिळून व्यापाऱ्याचे अपहरण करून त्याच्या भावाकडे ५० लाख रुपयांची खंडणी मागितली. पोलिसांनी १०० किलोमीटर पाठलाग करून संगमनेर येथे पाचही आरोपींना अटक करत व्यापाऱ्याची सुखरूप सुटका केली. आरोपींना माहिती देणाऱ्यालाही अटक करण्यात आली आहे. ही घटना रहाटणी परिसरात घडली.

चंद्रशेखर दीपचंद गौड (वय ३४, रा. सरदारगंज, ता. मेहनगर, जि. आजमगड, उत्तरप्रदेश), दिलीप मोहनलाल सरोज (वय २८, रा. रायपूर, ता. बारव, जि. प्रतापगड) रिंकू अलगुराम सरोज (वय २०, रा. बरहुआ, भोजपूर, ता. सदर, जि. प्रतापगड) अनिल गिरधारीलाल सरोज (वय २६, रा. सलीमभदारी, ता. लालगंज, जि. प्रतापगड), मुकेशकुमार राममुरत चमार (वय २४, रा. काशीपूर, ता. कान्डा, जि. प्रतापगड) आणि आरोपींना माहिती देणाऱ्या संतन सुरेश चव्हाण याला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन देशी पिस्तुले, सहा जिवंत राऊंड, पाच मोबाइल, फिर्यादी यांचे सात लाख रुपये किमतीचे घड्याळ, मोटारीसह एकूण १८ लाख २८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

खंडणी विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने यांनी याबाबत माहिती दिली. अपहरण झालेले व्यापारी रहाटणी परिसरातील आहे. ते दुचाकीवरून जात असताना आरोपी त्यांच्याजवळ आले. त्यांनी स्वत:ला ‘उत्तर प्रदेश पोलीस’ असल्याचे सांगत काही चौकशी करायची असल्याचे सांगितले. पोलीस असल्याचा धाक दाखवत आरोपींनी व्यापाऱ्याला मोटारीत बसवले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे व्यापारी गोंधळून पळून जाऊ लागले.

मात्र, एका आरोपीने त्यांच्या दुचाकीला धक्का देत खाली पाडले. त्यानंतर आरोपींनी त्यांना जबरदस्तीने मोटारीत बसवले. तेथून वेगाने पसार झाले. काही वेळातच आरोपींनी व्यापाऱ्याच्या भावाला फोन केला. अपहरण केल्याचे सांगत ५० लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे दिले नाहीत तर त्यांना ठार मारण्याची धमकीही आरोपींनी दिली. या फोननंतर कुटुंबीय घाबरले. मात्र, त्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधत संपूर्ण माहिती दिली.

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तातडीने तांत्रिक तपास सुरू केला. रहाटणी परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अपहरणाची घटना कैद झाली. व्यापाऱ्याच्या भावाला विश्वासात घेऊन आरोपींशी दूरध्नीवर संपर्क कायम ठेवण्यास सांगण्यात आले. सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. कॉल लोकेशनवरून आरोपी शहराबाहेर पळाल्याचे स्पष्ट झाले. आरोपींचा माग काढत १०० किलोमीटरचा पाठलाग केला. तपासादरम्यान आरोपी संगमनेर परिसरातून पुढे जात असल्याचे निष्पन्न झाले.

 खंडणी विरोधी पथक तसेच संगमनेर पोलिसांच्या पथकाने संगमनेर पथकर नाका येथे सापळा लावून चार आरोपींना जेरबंद करून व्यापाऱ्याची सुखरूप सुटका केली तर, गुंडा विरोधी पथकाने दोन आरोपींना अटक केली. पाच आरोपी उत्तर प्रदेश येथील असल्याचे समोर आले असून त्यांनी खंडणीसाठी अपहरणाचा कट रचल्याची माहिती पोलिसांनी दिली. चव्हाण याचे व्यापाऱ्याच्या शेजारी दुकान होते. त्याने आरोपींना सर्व माहिती दिली होती. पोलिसांनी त्यालाही अटक केली आहे.