पुणे : बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत मध्यरात्री पोलिसांनी झाडाझडती घेतली. या कारवाईत पोलिसांनी दोन बांगलादेशी तरुणींना ताब्यात घेतले, तसेच चार अल्पवयीन मुलींची सुटका केली. झाडाझडतीत इंजेक्शन, चरस सापडले. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत वास्तव्य करणाऱ्या महिलांसह ७०० जणांची पोलिसांनी चौकशी केली.

अमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी राजेश्वर विभीषण बिराजदार (रा. लातूर) याला अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख या वेळी उपस्थित होते.

बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत पोलिसांनी विशेष तपासणी मोहीम (कोम्बिंग ऑपरेशन) मध्यरात्री राबविली. या मोहिमेत अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखिल पिंगळे, कृषीकेश रावले यांच्यासह २२ वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ६०० पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्याअनुंषगाने पोलिसांनी ही मोहीम राबविली. पहाटेपर्यंत ही मोहीम राबविण्यात आली. पोलिसांनी या भागात वास्तव्य करणाऱ्या महिलांसह ७०० जणांची चौकशी केली. या कारवाईत दोन बांगलादेशी तरुणींना ताब्यात घेतले. चार अल्पवयीन मुलींना ताब्यात घेण्यात आले आहे.