scorecardresearch

TET Exam: आरोपींकडे सापडले ८८ लाख रुपये रोख आणि सोनं; पुणे पोलीस आयुक्तांचे धक्कादायक खुलासे, अशी होती मोडस ऑपरेंडी

शिक्षक पात्रता परीक्षेत गैरव्यवहार केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली असून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक केली आहे

TET Exam: आरोपींकडे सापडले ८८ लाख रुपये रोख आणि सोनं; पुणे पोलीस आयुक्तांचे धक्कादायक खुलासे, अशी होती मोडस ऑपरेंडी
शिक्षक पात्रता परीक्षेत गैरव्यवहार केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली असून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक केली आहे

शिक्षक पात्रता परीक्षेत गैरव्यवहार केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली असून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक केली आहे. सायबर पोलिसांनी ही अटकेची कारवाई केली असून पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी याप्रकऱणी काही धक्कादायक खुलासे केले आहेत. तुकाराम सुपे यांच्यासोबत आणखी एकाला अटक करण्यात आल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. तसंच याप्रकरणी अद्याप तपास सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

मोठी बातमी! पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक

“आम्ही दोन पेपरफुटीची प्रकरणं हाताळत होतो, यामध्ये प्राथमिकपणे आरोग्य भरतीचा तपास सुरु होता. यावेळी आम्हाला म्हाडाच्या परीक्षेची माहिती हाती लागली आणि परीक्षा होण्याच्या आदल्या रात्री सर्वांना अटक केली. याचा तपास सुरु असताना टीईटीच्या परीक्षेतही गडबड झाल्याचं समोर आलं. त्यानंतर आम्ही गुन्हा दाखल केला. जानेवारी २०२० मध्ये ही परीक्षा पार पडली होती. टीईटीच्या परीक्षेत जो काही गैरप्रकार सुरु होता त्यानुसार दोघांना अटक करण्यात आली आहे. तुपे यांच्यासोबत आणखी एकाला अटक करण्यात आली आहे,” अशी माहिती अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.

यावेळी आरोपींकडे ८८ लाख रुपये रोख, काही सोनं आणि एफडी सापडल्या असल्याची माहिती त्यांनी दिली. दोघांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे असं यावेळी त्यांनी सांगितलं.

अशी होती मोडस ऑपरेंडी –

“परीक्षा घेतल्यानंतर काही उमेदवारांना सीट क्रमांक लिहू नका सांगितलं जायचं. स्कॅनिंग करताना तो नंबर लिहिला जायचा. जर कोणी राहिलं असेल तर त्यांना पेपर पुन्हा तपासणीसाठी द्या सांगायचे आणि नंतर त्यात बदल केले जायचे,” अशी माहिती अमिताभ गुप्ता यांनी यावेळी दिली.

“३५ हजार ते १ लाखांपर्यंतची रक्कम उमेदवारांकडून घेतली जात होती. याशिवाय आणखी एक परीक्षा द्यावी लागते. त्यानुसार पैसे आकारले जात होते. आमच्या माहितीप्रमाणे साडे चार कोटी जमा झाले होते असा प्राथमिक अंदाज आहे. सध्या ९० लाख जप्त केले आहेत. याप्रकरणी अजून तीन ते चार जणांना अटक होण्याची शक्यता आहे,” असं अमिताभ गुप्ता यांनी सांगितलं. तपासात जर इतर काही परीक्षांमध्ये गैरव्यवहार झाल्याची माहिती आली तर त्याचाही तपास करण्यात येईल असं यावेळी सांगण्यात आलं.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-12-2021 at 13:37 IST

संबंधित बातम्या