पुणे : पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षात नेमून दिलेल्या कामाच्या वेळेत गैरहजर राहणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकाला निलंबिित करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले.
अभिजित प्रभाकर जाधव असे निलंबित करण्यात आलेल्या सहायक निरीक्षकाचे नाव आहे. सहायक निरीक्षक जाधव यांची ३१ मार्च २०२६ रोजी पोलीस नियंत्रण कक्षात दुपारी चार ते रात्री बारा यावेळेत ‘सीआरओ’ (कंट्रोल रुम ऑफिसर) म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पोलीस नियंत्रण कक्षातील वरिष्ठांना कोणतीही पूर्वसूचना न देता जाधव हे गैरहजर राहिले. त्यामुळे पोलीस नियंत्रण कक्षाकडून शहरातील महत्वाच्या घटनांचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करण्यास उशीर झाला. पोलीस नियंत्रण कक्षातील अधिकारी ही महत्वाची जबाबदारी आहे.
संपूर्ण शहरातील घडामोडींवर पोलीस नियंत्रण कक्षातील अधिकारी लक्ष ठेऊन असतात. यापूर्वी पूर्वसूचना न देता सहायक निरीक्षक जाधव हे गैरहजर राहिले होते. त्यांना वेळोवेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समजही दिली होती. मात्र, त्यांच्या वर्तणुकीत बदल झाला नव्हता. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जाधव यांची चौकशी केली. त्यांचे वर्तन हे बेजबाबदार आणि निष्काळजीपणाचा असल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यानंतर सहायक निरीक्षक जाधव यांना निलंबित करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.
गेल्या आठवड्यात बेकायदा धंदे करणाऱ्या एकाकडून पैसे घेणाऱ्या सहकारनगर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस फौजदारसह हवालदाराला निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहे. आठवडाभरात पुणे शहर पोलीस दलातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
दुकानातून एक लाख ४० हजारांची रोकड चोरी
शहरातील दुकानांचे कुलूप तोडून गल्ल्यातील रोकड चोरी करण्याच्या घटना वाढल्या आहेत. हडपसर परिसरातील एका दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी गल्ल्यातील एक लाख ४० हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली.
याबाबत संदीप रामदास नाळे (रा. कामठे वस्ती, फुरसुंगी, हडपसर-सासवड रस्ता) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाळे यांचे हडपसरमधील गोंधळेनगर परिसरात गोल्डन बॅटरी हे दुकान आहे. मंगळवारी (२८ एप्रिल) मध्यरात्री चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडले. गल्ल्यातील एक लाख ४० हजारांची रोकड चोरून चोरटे पसार झाले. मंगळवारी सकाळी दुकानाचे कुलूप तुटल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती कळविण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या चाेरट्यांच्या शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक कोलेवाड तपास करत आहेत.
