पुणे : पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या क्वीन्स गार्डन परिसरातील बंगल्यात एका पोलीस कर्मचाऱ्यानेच भरधाव मोटार घेऊन शिरण्याचा प्रयत्न केला. बंगल्यातील सुरक्षा यंत्रणेतील पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर त्याने मोटार घातली. त्याच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला अटकही करण्यात आली.अमोल वसंतराव भिसे (वय ४२) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. भिसे हा शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात नियुक्तीस आहे. ‘भिसे याची मानसिक स्थिती ठीक नाही. भिसेविरुद्ध त्याचा पत्नीने तक्रार दिली होती. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता,’ अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिसे याने तीन विवाह केले आहेत. त्याच्या पत्नीने २०२५ मध्ये पोलिसांकडे तक्रार दिली होती. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला निलंबितही करण्यात आले होते. त्याचे निलंबन नंतर रद्द करण्यात येऊन त्याला पुन्हा सेवेत घेण्यात आले. त्याची शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात नेमणूक करण्यात आली.
भिसे याची पोलीस मुख्यालायत नेमणूक केल्यानंतर तो अस्वस्थ झाला होता. तो मंगळवारी (३ नाेव्हेंबर) सायंकाळी दारू पिऊन नशेच्या अमलाखाली पोलीस आयुक्तांच्या क्वीन्स गार्डन परिसरातील बंगल्यात आला. बंगल्याच्या प्रवेशद्वाराजवळ सुरक्षा यंत्रणेतील पाेलीस कर्मचारी तैनात होते. मोटारीतून आलेल्या भिसे याला त्यांनी अडवले. त्याला आत जाण्यास मनाई केली. त्यानंतर त्याने मोटार भरधाव चालवून बंगल्याच्या प्रवेशद्वाराला धडक दिली. मोटार वेगाने येत असल्याचे पाहून पोलीस कर्मचारी बाजूला पळाले. मोटारीच्या धडकेत प्रवेशद्वाराचे नुकसान झाले. बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, भिसेविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दोन स्वतंत्र गुन्हे दाखल
पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या बंगल्यात शिरण्याचा प्रयत्न करणारा पोलीस कर्मचारी अमोल भिसे याने पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर मोटार घालण्याचा प्रयत्न केला. त्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला. भिसेला ताब्यात घेण्यात आल्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले. तेव्हा त्याने रुग्णालयाच्या आवारात गोंधळ घातला. या प्रकरणीही भिसेविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
