पुणे : पावसाळ्यातील वाहतूक व्यवस्थापनासाठी क्रेडाईकडून जुलै ते सप्टेंबर या कालावधीत १०० प्रशिक्षित ट्रॅफिक वॉर्डन्स नेमण्यात आले आहेत. या बाबत पुणे पोलीसांबरोबर करार करण्यात आल्याची माहिती ‘क्रेडाई’कडून देण्यात आली.‘क्रेडाई’च्या ट्रॅफिक वॉर्डन्सच्या नेमणुकीसाठी आयोजित कार्यक्रमाला पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह-पोलीस आयुक्त संजय दराडे, वाहतूक शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे, ‘क्रेडाई’चे अध्यक्ष मनीष जैन, या उपक्रमाचे संयोजक संजय देशपांडे, निवृत्त कर्नल कुमार रामचंद्रन उपस्थित होते.
शहराच्या वेगवेगळ्या भागांत सुरू असलेली रस्त्याची-मेट्रोची कामे आणि त्यात मुसळधार पावसामुळे वाहतूक कोंडीत वाढ होते. अशा परिस्थितीत ‘क्रेडाई’चे स्वयंसेवक वाहतूक पोलिसांना वाहतुकीच्या नियमनात मदत करतील. शहरातील वेगवेगळ्या भागांत, मुख्य चौकांमध्ये त्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. वाहतूक सुरळीत ठेवणे, कोंडी कमी करणे आणि गर्दीच्या वेळी आणि सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यान सुरक्षिततेस हातभार लावण्याची जबाबदारी या स्वयंसेवकांवर असेल. त्यासाठी त्यांना वाहतूक व्यवस्थापनाचे नियम, प्रत्यक्ष कार्यपद्धती आणि प्रत्यक्ष कामकाजाचे विशेष प्रशिक्षण देण्यात आल्याचेही ‘क्रेडाई’कडून कळविण्यात आले.
हे सर्व ट्रॅफिक वॉर्डन्स करार पद्धतीवर कार्यरत राहतील. ते दररोज सकाळी ८.०० ते रात्री ८.०० या वेळेत नियोजित विश्रांतीसह सेवा देतील. कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने जवळपास निम्म्या वॉर्डन्सची नियुक्ती त्यांच्या निवासस्थानाजवळील भागात करण्यात येणार असून, उर्वरित वॉर्डन्सना पुणे वाहतूक पोलिसांच्या गरजेनुसार शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये आणि संवेदनशील ठिकाणी तैनात करण्यात येईल. याविषयी बोलताना क्रेडाई पुणेचे अध्यक्ष मनीष जैन म्हणाले,‘क्रेडाई पुणेच्या दृष्टीने शहराच्या विकासात योगदान देणे म्हणजे केवळ घरे बांधणे नव्हे. मान्सून काळात पुणे वाहतूक पोलिसांच्या कार्याला बळ देण्यासाठी या उपक्रमात सहभागी होताना आम्हाला आनंद होत आहे. प्रभावी वाहतूक व्यवस्थापनाचा लाभ प्रत्येक नागरिकाला होतो. अतिरिक्त मनुष्यबळाच्या माध्यमातून पुणेकरांचा दैनंदिन प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि सुरळीत होण्यास मदत होईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.’
अमितेश कुमार म्हणाले,‘या उपक्रमाद्वारे पुणे वाहतूक पोलिसांना सहकार्य केल्याबद्दल मी क्रेडाई पुणेचे सर्व सदस्य, विशेषतः श्री मनीष जैन आणि श्री संजय देशपांडे यांचे मनःपूर्वक आभार मानतो. सर्व ट्रॅफिक वॉर्डन्सना प्रत्यक्ष सेवेत रुजू होण्यापूर्वी आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यांनी या प्रशिक्षणाचा प्रभावी वापर करून प्रामाणिकपणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने आपली जबाबदारी पार पाडावी. नागरिकांशी नेहमी नम्र, सन्मानपूर्वक आणि सौजन्यपूर्ण वर्तन ठेवावे. मान्सून काळात तसेच मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यान शहरातील वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यामध्ये त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरेल.’
