पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस भरतीसाठी झालेल्या लेखी परीक्षेत डमी परीक्षार्थी बसवल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणी मुख्य परीक्षार्थी आणि डमी उमेदवाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना बावधन परिसरातील परीक्षा केंद्रावर घडली असून हिंजवडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परीक्षा संपण्यास अवघे पाच मिनिटं राहिले असताना डमी परिक्षार्थीला पकडण्यात आलं.

मुनाफ हुसेन बेग अस डमी परीक्षार्थी असलेल्या तरुणाचे नाव आहे. तर, प्रकाश रामसिंग धनावत अस मुख्य परीक्षार्थी असलेल्या तरुणाचे नाव आहे. दोघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील ७२० पोलीस शिपाई जागांसाठी पोलीस भरती पूर्व लेखी परीक्षा शुक्रवारी पार पडली. यादरम्यान, काही परिक्षार्थ्यांनी नामी शक्कल लढवत डमी परीक्षार्थी बसवल्याचं समोर आलं आहे. बावधन येथील अरीहंत इन्स्टिट्युट परीक्षा केंद्रावर परीक्षेचा कालावधी संपण्यास अवघे पाच मिनिटे राहिली असताना डमी परिक्षार्थ्याचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले.

डमी परीक्षार्थी मुनाफ आणि प्रकाश दोघे काही प्रमाणात सारखे दिसतात, असं पोलिसांनी सांगितले. त्यामुळ पोलिसांची गफलत झाल्याने डमी परीक्षार्थी मुनाफ हा परीक्षा केंद्राच्या आत येण्यास यशस्वी झाला. त्यांची योजना यशस्वीरीत्या पार पडेल अस वाटत असताना पोलीस उपनिरीक्षक काकडे यांना गुप्त माहितीदारामार्फत माहिती मिळाली की संबंधित केंद्रावर डमी परीक्षार्थी बसवण्यात आला आहे. 

अगोदर मुनाफ हा तो डमी परीक्षार्थी नाही असं वारंवार सांगत होता. परंतु, त्याला मुख्य परिक्षार्थी प्रकाशच्या तीन सह्या करण्यास सांगितल्या तेव्हा त्यात तफावत आढळली आणि त्याला ताब्यात घेण्यात आलं. दरम्यान, मुख्य परीक्षार्थी प्रकाश धनावत हा परीक्षा केंद्राच्या जवळच असल्याने त्याला देखील ताब्यात घेतलं. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे हे करत आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.