पुणे : साखळी चोरीच्या प्रकरणात बावधन पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीला सात दिवसांच्या पोलीस कोठडीत देण्यासाठी केलेला अर्ज पौड येथील न्यायालयाने फेटाळून लावला. अटकेच्या प्रक्रियेत भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार तरतुदींचे पालन झाले नसल्याचे निदर्शनास आल्याने न्यायालयाने अटक बेकायदा ठरवून आरोपीला तत्काळ सोडून देण्याचे आदेश दिले.
बावधन पोलिसांनी एका आरोपीला शुक्रवारी (२८ ऑगस्ट) रात्री अकराच्या सुमारास अटक केली. त्यानंतर शनिवारी पौड येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. पाटील यांच्या न्यायालयात त्याला हजर केले. आरोपीला सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याची विनंती पोलिसांनी न्यायालयाकडे केली. चोरलेले सोन्याचे दागिने जप्त करणे, साथीदारांचा शोध घेणे अशी कारणे पोलीस कोठडीसाठी मागण्यात आली होती. आरोपीच्या वकिलांनी आरोपीची अटकेची प्रक्रिया बेकायदा असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता.
आरोपीचे वकील ॲड. सुचित मुंदडा, ॲड. केतनकुमार जाधव, ॲड. शुभम बलकवडे यांनी अटकेच्या वेळी पोलिसांनी अनिवार्य तरतुदींचे पालन केले नसल्याचा दावा न्यायालयात केला. अटक केल्यानंतर पोलीस अधिकाऱ्याने अटकेची माहिती, ताब्यात घेण्यात आलेले ठिकाण त्वरीत आरोपीचे नातेवाईक किंवा मित्रांना कळविणे गरजेचे होते. याबाबतची नोंद पोलीस ठाण्यातील नोंद वहीत (स्टेशन डायरी) करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
न्यायालयाने या प्रक्रियेचे काटेकोरपपणे पालन केले पाहिजे, असे आदेश दिले आहेत. मात्र, या प्रकरणआत पोलिसांनी आरोपीच्या अटकेची माहिती नातेवाईकांना समाज माध्यमातील संदेशाद्वारे पाठविली होती. ॲड. जाधव यांनी यावर आक्षेप घेतला. ‘ समाज माध्यमातून संदेश पाठविणे, कायदेशीर तरतुदींचे पालन झाल्याचा पुरावा न देणे या बाबी अटकेची प्रक्रिया वैध ठरविण्यासाठी पुरेेशा नाहीत’, असे ॲड. जाधव यांनी युक्तिवादात न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
