नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई तीव्र

पुणे : शासनाकडून खासगी कार्यालये, सरकारी कार्यालयातील उपस्थितीबाबत काही निर्देश आल्यानंतर शहरातील संचारबंदी आणि वाहतूक बंदीचे निर्बंध शिथिल झाले आहेत. निर्बंध शिथिल झाल्यानंतर सिग्नल मोडणे, पादचारी मार्गावर (झेब्रा क्रॉसिंग) वाहन उभे करणे, भरधाव वाहन चालविणे यासह विविध प्रकारचे नियमभंग करणाऱ्यांविरोधात कारवाई तीव्र करण्यात आली आहे.

गेले दोन महिने वाहतूक पोलिसांची सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे करण्यात येणारी कारवाई संचारबंदीमुळे काहीशी मंदावली होती. सोमवारपासून (८ जून) सरकारी तसेच खासगी कार्यालयातील कामकाज निर्देशानुसार सुरू झाल्यानंतर शहरातील जंगली महाराज रस्ता, फग्र्युसन रस्ता, टिळक रस्ता, बाजीराव  रस्ता, गणेशखिंड रस्ता, पुणे-सातारा रस्ता, शास्त्री रस्ता, कर्वे रस्ता, सिंहगड रस्त्यावर वर्दळ वाढल्याचे पाहायला मिळाले. वाहतूकबंदीचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर शहरातील प्रमुख रस्त्यांवर गेल्या पंधरवडय़ापासून वर्दळ वाढली आहे. संचारबंदीचे कठोर निर्बंध लागू असताना वाहतूक पोलिसांनी या काळात संचारबंदीचे आदेश मोडून जाणाऱ्या वाहनचालकांकडून थकीत दंडाची वसुली करण्यावर भर दिला होता.

याबाबत वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (नियोजन) अनिल पाटील म्हणाले, शहरातील निर्बंध शिथिल झाले आहेत. संचारबंदीच्या काळात अनेक रस्ते बंद होते. या काळात रस्त्यावर फारशी वाहने देखील नव्हती. निर्बंध शिथिल झाले असून रस्त्यांवर वाहनांची वर्दळ वाढलेली आहे. वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे. नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांविरोधात वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे.

सिग्नल यंत्रणा कार्यान्वित; सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

शहरातील प्रमुख रस्त्यांवरील सिग्नल यंत्रणा गेल्या आठवडाभरापासून कार्यान्वित करण्यात आली आहे. रस्त्यावर नेहमीच्या तुलनेत वाहनांची संख्या तशी कमी असली, तरी अनेक वाहनचालक सिग्नल पाळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. अशा वाहनचालकांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे कारवाई करण्यात येत आहे तसेच विरुद्ध दिशेने जाणे, मोबाइलवर संभाषण करणे, पादचारी पट्टय़ांवर वाहने लावणे यासह विविध प्रकारचे नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई यापुढील काळात तीव्र केली जाणार आहे.

सव्वाकोटींची ‘नाकाबंदी’

संचारबंदीचे आदेश असताना रस्त्यावर वाहने घेऊन आलेल्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. वाहतूक पोलिसांनी शहरातील प्रमुख चौकांत नाकाबंदी केली होती. नाकाबंदीत अनेक वाहनचालकांनी नियमभंग केल्यानंतर थकीत दंडाची रक्कम भरली नसल्याचे उघडकीस आले. वाहतूक पोलिसांनी गेल्या महिनाभरात ७३ हजार २१८ वाहनांची नाकाबंदीत तपासणी केली. त्यापैकी २४ हजार ७९४ वाहनचालकांकडून १ कोटी १७ लाख ४६ हजार २८६ रुपये एवढा थकीत दंड वसूल करण्यात आला.

सव्वाकोटींची ‘नाकाबंदी’

संचारबंदीचे आदेश असताना रस्त्यावर वाहने घेऊन आलेल्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. वाहतूक पोलिसांनी शहरातील प्रमुख चौकांत नाकाबंदी केली होती. नाकाबंदीत अनेक वाहनचालकांनी नियमभंग केल्यानंतर थकीत दंडाची रक्कम भरली नसल्याचे उघडकीस आले. वाहतूक पोलिसांनी गेल्या महिनाभरात ७३ हजार २१८ वाहनांची नाकाबंदीत तपासणी केली. त्यापैकी २४ हजार ७९४ वाहनचालकांकडून १ कोटी १७ लाख ४६ हजार २८६ रुपये एवढा थकीत दंड वसूल करण्यात आला.