पुणे : अमली पदार्थाच्या व्यसनांचा विळखा आणि तरुणांचे प्रबोधन करण्यासाठी पुणे महानगरपालिका आणि पुणे पोलिसांकडून ‘ड्रगमुक्त प्रभाग – ड्रगमुक्त पुणे ’ ही मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेला पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या हस्ते बुधवारी सुरुवात करण्यात आली.
या निमित्त पद्मावती येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, राजेश बनसोडे, मनोज पाटील, उपायुक्त मिलिंद मोहिते, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले या वेळी उपस्थित होते.
या वेळी पोलीस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले, ‘अमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांकडून कडक कारवााई करण्यात येत आहे. फक्त गुन्हा दाखल करून अमली पदार्थ तस्करीची समस्या सुटणार नाही. अमली पदार्थ तस्करीच्या मुळापर्यंत जाण्याचे आदेश तपास पथकांना देण्यात आले आहे. अमली पदार्थ पुरवठादारांना अटक करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे.’
‘शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी लोकप्रतिनिधींशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. अमली पदार्थ विक्री करणारे, तसेच तस्करांची माहिती नागरिकांनी कळवावी. पोलिसांकडून त्वरित कारवाई करण्यात येईल. तक्रारदाराचे नावही गोपनीय ठेवण्यात येईल,’ असे त्यांनी नमूद केले. श्रीनाथ भिमाले यांनी या वेळी मनोगत व्यक्त केले. या मोहिमेस सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. ‘महानगरपालिकेचे सर्व नगरसेवक, कार्यकर्ते नागरिकांनी ‘ड्रग फ्री पुणे’ हे ॲप मोबाइलमध्ये समाविष्ट करावे. या ॲपच्या माध्यमातून नागरिकांनी त्वरित तक्रार द्यावी,’ असे आवाहन भिमाले यांनी केले. उपायु्क्त मोहिते यांनी प्रास्ताविक केले.
