पुणे : मुंढवा भागातील गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांकडील मोबाइल संच चोरणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी पकडले. चोरट्याकडून ३१ मोबाइल संच जप्त करण्यात आले. सतीश देवा हिरेकेरुर (वय ३६, रा. टाटा सोसायटी, विकासनगर, घोरपडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. गणेशोत्सवात मुंढवा भागातील मंडळांचे देखावे पाहण्यासाठी मोठी गर्दी होते. गर्दीत नागरिकांचे मोबाइल संच चोरणाऱ्या चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केले आहे. हेही वाचा : महिलेला धमकावून विनयभंग; माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या मुलाविरूद्ध गुन्हा हिरेकेरुर याने नागरिकांची मोबाइल संच चोरल्याची माहिती तपास पथकातील कर्मचारी दिनेश भांदुर्गे, महेश पाठक यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडून ३१ मोबाइल संच जप्त करण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रदीप काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संदीप जोरे, उपनिरीक्षक धनंजय गाडे, दिनेश राणे, दिनेश भांदुर्गे, महेश पाठक, वैभव मोरे, राहुल मोरे, सचिन पाटील, स्वप्नील रासकर आदींनी ही कारवाई केली.