scorecardresearch

सिंहगड महाविद्यालय परिसरात दहशत माजविणाऱ्या गुंडांना पोलिसांचा चोप ; पोलिस कारवाईचे कौतुक

सिंहगड विधी महाविद्यालय परिसरात कोयता घेऊन दोघांनी दहशत निर्माण केल्याची घटना बुधवारी रात्री घडली.

सिंहगड महाविद्यालय परिसरात दहशत माजविणाऱ्या गुंडांना पोलिसांचा चोप ; पोलिस कारवाईचे कौतुक
कात्रज च्या नगरसेविका सौ मनीषा राजाभाऊ कदम यांनी या जवान पोलीस अंमलदार यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार केला आहे….

पुणे शहरातील कोयता गँगचा विषय विधीमंडळात गाजत असताना आंबेगाव येथील सिंहगड विधी महाविद्यालय परिसरात कोयता घेऊन दोघांनी दहशत निर्माण केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. आरोपींनी वाहनांबरोबरच दिसेल त्या व्यक्तींवर आणि दुकानांवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या घटनेने घाबरलेले नागरिक पळत सुटले होते.

गस्तीवर असलेल्या सिंहगड पोलिसांच्या दोघा कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून यातील एका अल्पवयीनाला पकडले. करण दळवी (रा.वडगाव) याच्यावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, हत्यार बाळगणे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दळवी फरार असून कोयत्याने वार केलेल्या अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. ही घटना भारती विद्यापीठ पोलिसांच्या हद्दीत घडली. मात्र, जवळच सिंहगड पोलिस ठाण्याचे मार्शल असल्याने त्यांनी पाठलाग करून आरोपीला पकडले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव परिसरातील विधी महाविद्यालयासमोरील खाऊ गल्लीत रात्री दहाच्या सुमारास करण आणि त्याचा अल्पवयीन साथीदार कोयते फिरवत आले. त्यांनी दुचाकींवर कोयत्याने वार केले. यानंतर येथील एका हॉटेलमध्ये घुसून एका ग्राहकावर कोयत्याने हल्ला केला. नंतर विद्यार्थ्यावर कोयत्याने वार केला. एकाच्या पाठीवर प्लास्टिकचा स्टूल फेकून मारला. दोघांनी मिळून परिसरात तब्बल वीस मिनिटे धुडगूस घातला. सिंहगड पोलिस ठाण्याचे मार्शल धनंजय पाटील आणि अक्षय इंगवले वडगाव हद्दीत गस्त घालत होते. याबाबत त्यांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा दोघेही आरोपी नागरिकांवर कोयते उगारत चालले होते. पोलिसांना बघताच दोघांनी पाळण्याचा प्रयत्न केला. पाटील आणि इंगवले यांनी पाठलाग करून अल्पवयीनाला ताब्यात घेतले. या घटनेची चित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित झाली आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-12-2022 at 01:54 IST

संबंधित बातम्या