पुणे : गंभीर गुन्ह्याच्या तपासात पुणे पोलिसांकडून नाफिस (नॅशनल ऑटोमेटेड फिंगरप्रिंट आयडेंटिफिकेशन सिस्टीम) प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. या प्रणालीच्या माध्यमातून शहरातील सराइतांच्या अंगुलीमुद्रा ( फिंगरप्रिंट्स) डिजिटल स्वरूपात संकलित करण्यात येणार आहे. गंभीर गुन्हा घडल्यानंतर घटनास्थळी आढळून आलेल्या सराइतांच्या ‘फिंगरप्रिंट्स’चे तत्काळ विश्लेषण करून माग काढण्यात येणार आहे.
‘नाफिस’ संगणकीय प्रणाली राष्ट्रीय गुन्हे सांख्यिकी संस्थेकडून (नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्यूरो) विकसित करण्यात आली आहे. देशभरातील गुन्हेगारांच्या अंगुलीमुद्रेच्या नोंदी संकलित करण्यात आल्या आहेत. ‘एनसीआरबी’च्या धर्तीवर पुणे पोलिसांनी या प्रणालीच्या माध्यमातून शहरातील सराइतांच्या अंगुलीमुद्रांचे संकलन केले आहे. त्या माध्यमातून गंभीर गुन्ह्यांचा छडा लावणे शक्य होणार आहे.
‘गंभीर गुन्हा घडल्यानंतर घटनास्थळी सापडलेले ठशांचे विश्लेषण करण्यात येणार आहे. ‘नाफिस’ संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून पुणे शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्यातील सराइतांच्या अंगुलीमुद्रांचे संकलन करण्यात आले आहे. या प्रणालीमुळे तपासास मदत होणार आहे, तसेच गुन्हेगारांचा माग काढणे शक्य होणार आहे,’ असे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी सांगितले.
तपास जलद आणि अचूक
पोलीस ठाण्यांच्या स्तरावर सराइतांचे ठसे पूर्वी कागदावर घेतलेले असायचे. या प्रणालीमुळे डिजिटल माध्यमातून ठशांचे संकलन (डाटाबेस ) केले जाणार आहे. या प्रणालीच्या माध्यमातून तपास जलद आणि अचूक होणार आहे. या प्रणालीचा वापर करण्यासाठी आवस्यक ती उपकरणे आणि टप्याटप्याने पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. ‘एनसीआरबी’कडे देशभरातील गुन्हेगारांची माहिती संकलित करण्यात आली आहे. नाफिस प्रणालीच्या शहरातील सराइतांची माहिती संकलित करण्यात आली आहे.
