पुणे : डेक्कन जिमखाना, शिवाजीनगर, तसेच मध्यभागातील विश्रामबाग, खडक, समर्थ, फरासखाना पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांनी गुरुवारी रात्री झाडाझडती घेतली. या कारवाईत वेगवेगळ्या भागात तपासणी करण्यात आली. बेकायदा प्रकार करणाऱ्या ४० जणांविरुद्ध खटले, तसेच गुन्हे दाखल करुन कारवाई करण्यात आली.

परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांच्या नेतृत्त्वाखाली फरासखाना, समर्थ, खडक, विश्रामबाग, डेक्कन आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही मोहीम राबविण्या आली. मध्यभागातील ४१ संवेदनशील ठिकाणे, मोकळ्या जागा, तसेच सार्वजनिक जागांची तपासणी करण्यात आली. सार्वजनिक मद्यप्राशन, अमली पदार्थांचे सेवन, शांतता भंग करणे, तसेच छेडछाड करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. गुरुवारी रात्री दोन तास ही माेहीम राबविण्यात आली. भारतीय न्याय संहिता २८५ अन्वये दोन गुन्हे दाखल करण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणे (कोटपा ॲक्ट) अन्वये पाच खटले दाखळ करण्यात आले. महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये २२ जणांविरुद्ध कारवाई केली. वाहतूक नियमभंग केल्या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली. ट्रिपल सीट जाणाऱ्या दहा दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाई करण्यात आली.

वाहन चालविताना मोबाइल संभाषण करणे, तसेच विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्त अमितेशकुमार, पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली खडक, शिवाजीनगर, डेक्कन, विश्रामबाग, फरासखाना, समर्थ पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पथके या कारवाईत सहभागी झाले होते. ‘यापुढील काळात पोलिसंकडून अचानक कारवाई करण्यात येेणार असून, संवेदनशील ठिकाणांची तपासणी करण्यात येणार आहे’, असे पोलीस उपायुक्त रावले यांनी सांगितले.