पुणे : गोंगाट, ध्वनीवर्धकांचे आवाज, वाहनांचे कर्णकर्कश हाॅर्नमुळे शहरातील ध्वनीप्रदूषणाच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे पोलिसांकडे गेल्या आठ महिन्यात ध्वनीप्रदूषणाच्या १४ हजार तक्रारी नागरिकांनी नाेंदविल्या आहेत. सर्वाधिक तक्रारी पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांनी केल्याची माहिती पोलिसांनी दिली. ‘ध्वनीप्रदूषणाच्या वाढत्या तक्रारींची दखल पोलिसांनी घेतली आहे. शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ध्वनीप्रदूषणांचे भाग (हाॅटस्पाॅट) पोलिसांनी निश्चित केले आहेत.

ध्वनीप्रदूषणाच्या वाढत्या तक्रारींची दखल घेऊन प्र्रत्येक पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गोंगाटाचे भाग किंवा ध्वनीप्रदूषणाचे पाच भाग (हाॅटस्पाॅट) निश्चित केले जाणार आहेत. ध्वनीप्रदूषणाच्या तक्रारी कोणत्या भागातून आल्या आहेत, याबाबतची माहिती संकलित करण्यात येणार आहेत,’ अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. ध्वनीप्रदूषणाबाबत आलेल्या प्रत्येक तक्रारीची दखल घेण्यात येणार आहे. तक्रारदाराचे म्हणणे किंवा त्याची बाजू ऐकून घेतली जाणार आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ज्या भागातून सर्वाधिक तक्रारी आल्या आहेत.

त्या तक्रारींमागच्या कारणांचा शोध घेतला जाणार आहे. तक्रारदार कोणत्या भागात राहतो, तक्रारीचे स्वरुप काय आहे? याबाबतची माहिती घेतली जाणार आहे. वारंवार एखाद्या भागातून तक्रार येत असल्यास त्या भागात भेट देऊन कार्यवाही (हाॅटस्पाॅट मॅनेजमेंट) केली जाणार आहे. तक्रारींपुरती कारवाई केली जाणार नाही. अशा प्रकाराच्या तक्रारींचे कायमस्वरुपी निराकरण करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना दिले आहेत.

आगामी दहीहंडी, गणेशोत्सवावर लक्ष?

शहर, तसेच उपनगरात सार्वजनिक स्वरूपात जयंतीचे कार्यक्रम आयोजित केली जातात. विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रम, तसेच मिरवणुकीत ध्वनीवर्धकांचा वापर केला जातो. ध्वनीवर्धकांच्या धडकी भरविणाऱ्या आवाजाच्या सर्वाधिक तक्रारी करण्यात येतात. आगामी दहीहंडी, गणेशोत्सवात अशा स्वरूपाच्या तक्रारींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गोंगाटाच्या भागांची पाहणी केली जाणार आहे. केवळ गणेशोत्सवापुरती ही कारवाई केली जाणार नाही. वर्षभर आयोजित केलेले कार्यक्रम, तसेच अन्य कारणांमुळे होणाऱ्या ‘आवाजा’वर पोलीस कारवाई करणार आहेत.

ध्वनीप्रदूषणाच्या तक्रारी कोणत्या भागातून?

पुणे पोलिसांच्या पर्वती, कोंढवा, चतु:शृंगी, येरवडा, हडपसर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ध्वनीप्रदूषणाच्या तक्रारींचे प्रमाण जास्त आहे. नगर रस्त्यावरील लोणीकंद, फुरसुंगी, लष्कर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ध्वनीप्रदूषणाच्या तक्रारींचे प्रमाण तुलनेने कमी असल्याचे दिसून आले आहे. ज्या भागातून तक्रारी आल्या आहेत. त्या भागास प्रत्यक्ष भेट देून आवाजाची पातळी तपासणी, डेसिबल, तसेच अन्य नियमांचे उल्लंघन होत असल्यास त्वरीत कारवाईचे आदेश देण्यात आले आहे.