पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या मंदिराच्या विस्तारासाठी फरासखाना-विश्रामबाग पोलीस ठाण्याची मोक्याची जागा ट्रस्टला हस्तांतरित करण्यास पुणे पोलिसांनी तत्त्वत: ‘ना-हरकत’ दिली आहे. पाेलीस ठाण्यांसाठी नवीन अत्याधुनिक इमारत बांधणे, पोलीस ठाण्याच्या आवारातील महत्त्वाच्या कार्यालयाचे स्थलांतर केल्यानंतर या जागेचा ताबा ट्रस्टकडे सोपविण्यात येण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी या बाबतचा प्रस्ताव गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांकडे नुकताच सादर केला आहे.
पुणे पोलिस आयुक्तालयातील फरासखाना-विश्रामबाग पोलीस ठाण्याची इमारत मोक्याच्या ठिकाणी आहे. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर असलेल्या या इमारतीत पुणे पोलिसांच्या पश्चिम विभागाचे मुख्यालय आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त, परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक विभाग आणि फरासखाना-विश्रामबाग पोलीस ठाणे या इमारतीत आहे. १९९७६-७७ मध्ये फरासखाना-विश्रामबाग पोलीस ठाण्याची इमारत बांधण्यात आली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर या इमारतीच्या परिसरात आहे. मंदिरात वर्षभर भाविकांची गर्दी असते. संकष्टी आणि अंगारक चतुर्थीला दर्शनासाठी मोठी गर्दी होती. भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन फरासखाना-विश्रामबाग पोलीस ठाण्याची जागा श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टला ही जागा हस्तांतरित करण्यात यावी, असा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता.
पोलीस ठाण्यासाठी नवीन जागा
‘पुणे पोलिसांनी या बाबत गृहविभागाकडे प्रस्ताव सादर केला. बुधवार पेठेतील महापालिकेची सिटी सर्व्हे क्रमांक १११२ आणि १११३ येथील जागा प्रथम पोलीस दलाच्या नावावर हस्तांतरित करण्यात यावी. या जागेवर फरासखाना-विश्रामबाग पोलीस ठाण्यासाठी अत्याधुनिक इमारत बांधण्यात यावी. या इमारतीचा खर्च श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक ट्रस्ट किंवा गृह विभागाने करावा. बुधवार पेठेतील जागेची किंमत श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टने सरकारला द्यावी,’ अशा अटी पोलिसांनी प्रस्तावात घातल्या आहेत.
नवीन इमारतीच्या कामानंतरच स्थलांतर’
मोक्याच्या ठिकाणी असलेल्या पोलीस ठाण्यांचे कामकाज चालविण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध नाही. बुधवार पेठेतील निश्चित केलेल्या जागेवर पोलिसांसाठी नवीन इमारत बांधण्यात आल्यानंतर फरासखाना-विश्रामबाग पोलीस ठाण्याची जागा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. बुधवार पेठेतील महापालिकेची जागा ७५९.२० चौरस मीटर आहे. तेथील ३.५ एफएसआयमुळे सुमारे २८,६२१ चौरस फूट बांधकाम करणे शक्य होणार आहे. फरासखाना पोलीस ठाण्याची सध्याची जागा ८७३.७० चौरस मीटर आहे. या इमारतीचे बांधकाम क्षेत्र २२ हजार चौरस फूट आहे. नवीन इमारतीची जागा फरासखाना पोलीस ठाण्यापासून ३०० मीटर अंतरावर आहे. नव्या जागेवर पोलिसांसाठी प्रशस्त इमारत बांधणे शक्य होईल, असे प्रस्तावात म्हटले आहे.
