पुणे : ‘वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहन चालकां विरुद्ध कारवाई करण्यासाठी तयार केलेल्या ‘पीटीपी ॲप’वर नागरिकांनी बेकायदा फलकांची माहिती कळवावी’, असे आवाहन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी केले आहे. बेकायदा फलक लावणाऱ्यां विरुद्ध थेट गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा त्यंनी दिला.
शहरातील बेकायदा फलकांवर कारवाई करण्यासाठी ‘होर्डिंगमुक्त पुणे’ ही विशेष मोहीम महापालिका प्रशासन आणि पुणे पोलिसांनी घेतली आहे. बेकायदा फलकांमुळे शहर विद्रुुप होत असून, पुण्यातील बेकायदा फलकांविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषदेत शहरातील बेकायदा फलकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दिला होता. ‘होडिंगमुक्त पुणे’ या मोहिमेतंर्गत शहरातील बेकायदा फलकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.
‘वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहन चालकां विरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलिसांनी पीटीपी ॲप तयार केले आहे. या ॲपवर नागरिकांना वाहतूक नियमभंगाची तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार नागरिकांनी या ॲपला उस्फूर्ते प्रतिसाद दिला. पीटीपी ॲपच्या माध्यमातून बेकायदा फलकांवर कारवाई करण्यात येणार असून, नागरिकांनी बेकायदा फलकांची माहिती कळवावी’, असे आवाहन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी केले आहे.
वाहतूक पोलिसांकडून सोमवारी (२३ मार्च) पीटीपी ॲपवर सर्वाधिक तक्रारी नोंदविणाऱ्या नागरिकांचा सत्कार करण्यात आला. आतापर्यंत पुण्यातील दीड लाखांहून जास्त नागरिकांनी या ॲपचा वापर केला अहे. या ॲपच्या माध्यमातून दोन लाख ४९ हजार तक्रारी करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी तक्रारींची पडताळणी करुन एक लाख ७६ हजारांहून जास्त वाहन चालकां विरुद्ध ई-चलनाद्वारे दंडात्मक कारवाई केली आहे. सर्वाधिक तक्रारी नोंदविणाऱ्या नागरिकाला प्रथम क्रमांकसाठी ५० हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले, तसेच २५ ते १५ हजार रुपये रोख बक्षीस तक्रार देणाऱ्या नागरिकांना या कार्यक्रमात देण्यात आले. सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, वाहतूक शाखेचे उपायु्क्त हिंमत जाधव या वेळी उपस्थित होते.
बेवारस वाहनांवर कारवाई
‘शहरात रस्त्याच्या कडेला बेवारस वाहने लावण्याचे प्रमाण मोठे आहे. या वाहनांवर पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी अशा वाहनांची छायाचित्रे काढून पीटीपी ॲपच्या माध्यमातून पाठवावी. महापालिका आणि पोलिसांकडून ही कारवाई केली जाणार आहे. बेवारस वाहने ठेवण्यासाठी महापालिकेने पंधरा ठिकाणे सुचविली आहेत. ही वाहने उचलून नेण्यासाठी टोईंग व्हॅन उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत’, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.
