पुणे : शहराच्या गर्दीच्या ठिकणांहून मोबाइल संच चोरीला जाणे, तसेच गहाळ होण्याच्या घटना वाढल्या आहेत. पुणे पोलिसांच्या परिमंडळ पाचच्या हद्दीतून गहाळ झालेले १७१ मोबाइल संच तक्रारदारांना नुकतेच परत करण्यात आल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले.

पुणे पोलिसांच्या परिमंडळ पाचच्य अखत्यारीत नऊ पोलीस ठाणे आहेत. या पोलीस ठाण्याांच्या हद्दीतून नागरिकांचे मोबाइल संच चोरीला गेले होते, तसेच काहीजणांचे मोबाइल संच गहाळ झाले होते. याबाबत पुणे पोलिसांच्या ‘लाॅस्ट अँड फाऊंड’ पोर्टलवर तक्रारी करण्यात आल्या होत्या. पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. तांत्रिक तपासात हे मोबाइल संच दुसरे सीमकार्ड घालून वापरत असल्याचे उघडकीस आले.

पोलिसांनी मोबाइल संच वापरणाऱ्यांशी संपर्क साधला आणि हे मोबाइल संच परत करण्याच्या सूचना दिल्या. मोबाइल संच परत न दिल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. चोरीचे मोबाइल विकत घेऊन वापरणे हा गुन्हा असल्याचे पोलिसांनी त्यांना सांगितले. त्यानंतर पोलिसांकडे १७१ मोबाइल संच जमा करण्यात आले. मोबाइल संच तक्रारदारांना परत करण्यासाठी हडपसर भागातील एका मंगल कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे यांच्या हस्ते मोबाइल संच तक्रारदारांना परत करण्यात आले. यावेळी पोलीस उपायुक्त डाॅ. शिंदे यांनी मोबाइल संच शोधण्यासाठी वापरलेल्या तांत्रिक तपासाची माहिती तक्रारदारांना दिली. ‘ मोबाइल संच वापरणे हे अविभाज्य भाग आहे. एखाद्या व्यकीचा मोबाइल संच हरविल्यानंतर तो अस्वस्थ असतो. मोबाइलमधील माहिती, छायाचित्रांशी त्याचा भावनिक नाते असते. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि मदतीसाठी पोलीस सदैव तत्पर असतात’, असे डाॅ. शिंदे यांनी नमूद केले.

हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांनी प्रास्ताविक केले. उपनिरीक्षक शंभूराज जाधव यांनी सूत्रसंचालन केले. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त अनुराधा उदमले, नम्रता देसाई, पोलीस निरीक्षक संजय मोगले, नीलेश जगदाळे, उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, अल्ताफ शेख, पोलीस कर्मचारी संदीप राठोड , समीर पांडुळे, बापू लोणकर, माधुरी डोके, सोनाली कुंभार, विक्रम भोर यांनी ही कामगिरी केली.

पोलिसांकडून अनोखी भेट

मोबाइल संच हरिवल्यानंतर आम्ही अस्वस्थ झालाे होतो. मोबाइल संच परत मिळेल की नाही, याची शाश्वती नव्हती. मोबाइलमध्ये महत्त्वाची माहिती होती. पोलिसांनी मोबाइल संच शोधले, याचे कौतुक वाटते. पोलिसांनी दिलेली ही अनोखी भेट आहे’, अशी भावना तक्रारदारांनी व्यक्त केली.