पुणे : क्रीडापटू असल्याची बनावट प्रमाणपत्रे सादर करून क्रीडापटूंसाठी राखीव असलेल्या आरक्षणातून पुणे शहर पोलीस दलात १९ उमेदवार भरती झाल्याची माहिती उघडकीस आली आहे. या प्रकरणातील नऊ उमेदवार पोलीस प्रशिक्षणासाठी गेले असून, गुन्हे शाखेने कारवाई करून बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या क्रीडा संघटनेच्या दोघांना अटक केली. या प्रमाणपत्रसाठी तीन ते पाच लाख रुपये घेतल्याची माहिती तपासात मिळाली आहे.
या प्रकरणी महाराष्ट्र राज्य कुराश असोसिएशनचे अध्यक्ष अंकुश नागर, सचिव शिवाजी साळुंखे यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी परभणी जिल्ह्यातील कुराश असोसिएशनचे संघटक, धाराशीव जिल्ह्यातील संघटकांसह अन्य पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागर आणि साळुंखे यांना न्यायालयाने ८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आरोपींविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे पोलीस दलातील सन २०२४ ते २०२६ च्या भरती प्रक्रियेत १९ उमेदवारांनी कुराश आणि ड्रॅगन बोट या क्रीडा प्रकारांचे बनावट प्रमाणपत्र दिले होते. १९ उमेदवार भरती झाल्याची माहिती एकाला मिळाली होती. त्यानंतर त्यांनी या बाबत पुणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दिला होता. या बाबतची कागदपत्रे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणात सखोल चौकशी करण्यात आली. तेव्हा १९ उमेदवारांनी बनावट प्रमाणपत्र दिल्याचे उघड झाले.
शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील मैदानावर भरती प्रक्रिया पार पडली. तेव्हा बनावट प्रमाणपत्र देऊन शासनाची फसवणूक केली. या खेळांच्या स्पर्धाही पार पडल्या नव्हत्या. मात्र, १९ उमेदवारांनी संबंधित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संगनमत करून स्पर्धेतील सहभागाची माहिती कागदपत्रांद्वारे दिल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
क्रीडा विभागातही चौकशी
२०२० नंतर शासकीय परिपत्रकानुसार राज्यस्तरीय स्पर्धेत शासनाचा प्रतिनिधी आवश्यक असणे आवश्यक आहे. कुराश क्रीडा प्रकार संघटनेने शासनाच्या क्रीडा संचालनालयास या बाबतची माहिती न देता परस्पर स्पर्धेचे आयोजन केले होते. क्रीडा विभागासह शासनाची फसवणूक केल्याची माहिती पाेलिसांनी दिली. त्याअनुंषगाने क्रीडा विभागातही पोलिसांकडून चाैकशी करण्यात येणार आहे.
