पुणे : पुणे शहर पोलीस दलातील भरती प्रक्रियेत कुराश या क्रीडा प्रकाराची बनावट प्रमाणपत्रे सादर करून आरक्षणाचा गैरफायदा घेतल्याचा प्रकार गुन्हे शाखेने नुकताच उघडकीस आणला. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या कुराश क्रीडा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यभरात एक हजारापेक्षा जास्त बनावट प्रमाणपत्रे पैसे घेऊन विविध शासकीय विभागातील भरती प्रक्रियेतील उमेदवारांना दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणात गुन्हे शाखेने कोल्हापुरातील एका दाम्पत्याला अटक केली.

ऋती पुनगावकर (वय ४५), धैर्यशील पुनगावकर (वय ५१, दोघे रा. कोल्हापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणात यापूर्वी महाराष्ट्र राज्य कुराश असोसिएशनचे अध्यक्ष अंकुश नागर आणि सचिव शिवाजी साळुंके यांना अटक करण्यात आली होती. आतापर्यंत या प्रकरणात चौघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी काही जणांची चौकशी सुरू आहे, अशी माहिती गुन्हे शाखेच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते यांनी दिली.

‘पुनगावकर दाम्पत्य कुराश संघटनेचा सचिव शिवाजी साळुंके यांचे नातेवाईक आहेत. पुनगावकर दाम्पत्य हे काेल्हापुरातील क्रीडा प्रशिक्षण संस्थेचे संचालक आहे. पुनगावकर दापम्त्याच्या क्रीडा संस्थेत बनावट प्रमाणपत्रे तयार करण्यात आल्याची माहिती तपासात मिळाली आहे. साळुंके याला अटक करण्यात आली, तेव्हा त्याने बनावट प्रमाणपत्रे जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली. साळुंके आणि नागर यांची समोरासमोर चौकशी करण्यात आली. तेव्हा या प्रकरणात पुनगावकर दाम्पत्य सामील असल्याचे उघड झाले. पुनगावकर यांना कोल्हापूरातून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत ते या प्रकरणात सामील असल्याचे उघडकीस आले,’ असे अतिरिक्त आयुक्त सातपुते यांनी सांगितले.

कुराश संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या ११ वर्षांत एक हजारांहून जास्त बनावट प्रमाणपत्रे उमेदवारांना दिली आहेत. त्यापोटी त्यांनी उमेदवारांकडून पैसे घेतल्याची माहिती तपासात मिळाली आहे. बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे किती जणांनी शासकीय नोकरी मिळवली, या दृष्टीने पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. पुणे पोलीस दलात बनावट प्रमाणपत्राच्या आधारे १९ उमेदवार भरती झाले. त्यापैकी १० जण प्रशिक्षणासाठी गेले. उर्वरित नऊ जणांचे अद्याप प्रशिक्षण झालेले नाही. भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या उमेदवारांनी प्रमाणपत्रे दिली होती. या प्रमाणपत्रांची तपासणी, पडताळणी क्रीडा विभागाकडून करण्यात आली. या प्रमाणपत्रांना मान्यता देण्यात आली. प्रमाणपत्रांना मान्यता कोणत्या आधारावर देण्यात आली, या दृष्टीने तपास करण्यात येत आहे.