पुणे : पुणे पोलीस दलातील भरती प्रक्रियेत ‘कुराश’ या क्रीडा प्रकाराची बनावट प्रमाणपत्रे सादर करून क्रीडापटूंच्या आरक्षणाचा गैरफायदा घेऊन फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेने सखाेल तपास सुरू केला आहे. ‘कुराश’ असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यभरात एक हजार बनावट प्रमाणपत्र दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. बनावट प्रमाणपत्रांद्वारे किती जणांनी शासकीय नोकरी मिळविल्या, या दृष्टीने तपास करण्यात येत आहे.

‘पुणे पोलीस दलातील भरती प्रक्रियेत ‘कुराश’ क्रीडा प्रकारातील बनावट प्रमाणपत्र सादर करून १९ जणांनी नोकरी मिळवल्याचे उघड झाल्याप्रकरणी नुकताच गुन्हा दाखल करण्यात आले. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे. बनावट प्रमाणपत्रांद्वारे आणखी किती जणांना शासकीय नोकरी मिळविल्या, या दृष्टीने तपास करण्यात येत आहे, असे गुन्हे शाखेच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पोलीस उपायुक्त गौहर हसन या वेळी उपस्थित होते.

या प्रकरणी महाराष्ट्र राज्य कुराश संघटनेचे अध्यक्ष अंकुश नागर आणि शिवाजी साळुंके यांना गुन्हे शाखेने नुकतीच अटक केली. या प्रकरणातील स्पर्धांमध्ये सहभागी झाल्याचे प्रमाणपत्र त्यांनी दिले होते. शासकीय नोकरी प्रक्रियेत क्रीडापटूंसाठी पाच टक्के आरक्षण आहे. या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी बनावट प्रमाणपत्रांचा वापर झाल्याची शक्यता आहे. पुणे पोलीस दलातील भरती प्रक्रियेत या प्रमाणपत्राच्या आधारे १९ उमेदवारांनी आरक्षणाचा लाभ घेतल्याचे उघडकीस आले. त्यापैकी १० उमेदवार पोलीस प्रशिक्षणासाठी गेले आहेत. उर्वरित नऊ जणांचे प्रशिक्षण अद्याप सुरू झाले नाही. भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची क्रीडा विभागाकडून पडताळणी करण्यात आली. प्रमाणपत्रांना मान्यताही देण्यात आली. बनावट प्रमाणपत्रांना मान्यता कशी देण्यात आली, या दृष्टीनेही तपास करण्यात येत आहे.

अन्य शासकीय विभागांतही नोकरी ?

बनावट प्रमाणपत्रांचा वापर केवळ पोलीस भरतीत झाला नाही. अन्य शासकीय विभागातील भरती प्रक्रियेत बनावट प्रमाणपत्रांचा वापर झाल्याची शक्यता आहे. कुराश संघटनेकडून एक हजार बनावट प्रमाणपत्रांचे वाटप राज्यभरात करण्यात आले आहे. किती उमेदवारांनी शासकीय नोकरी मिळवली; तसेच किती जण शासकीय सेवेत आहेत, या दृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.