Pune Police Drug Seizure Operation: गेल्या अडीच महिन्यात पुणे पोलिसांनी १६६ किलो गांजा जप्त केला असून, गांजा तस्करीप्रकरणी ३१ जणांना अटक केली आहे. गेल्या काही वर्षांपासून गांजाची नशा करण्याचे प्रमाण वाढले आहे. अगदी उच्चशिक्षित, माहिती-तंत्रज्ञान कंपनीतील कर्मचारी, कष्टकरी वर्ग गांजाची नशा करत असल्याचे उघडकीस आले आहे.
पुणे पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीविरुद्ध कारवाई करण्यासाठी विशेष माेहीम हाती घेतली आहे. ज्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अमली पदार्थांची विक्री होते, अशी ठिकाणे पोलिसांनी निश्चित केली आहेत. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी अमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. थेट पुरवठादारांविरुद्ध कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
गेल्या अडीच महिन्यांत पुणे पोलिसांनी शहरातील वेगवेगळ्या भागांत कारवाई करून गांजा विक्रीस घेऊन आलेल्या २१ जणांना अटक केली. त्यांच्याकडून १६६ किलो गांजा जप्त केला आहे. पोलिसांनी गांजा तस्करीचा सखोल तपास केला. तेव्हा ओडिशा, छत्तीसगड, आंध्र प्रदेश या तीन राज्यांतून शहरात मोठ्या प्रमाणावर गांजा विक्रीस पाठविला जात असल्याचे उघडकीस आले आहे.
‘ओडिशातील मलकानगिरी, कोरापूट, आंध्र प्रदेशातील दुर्गम भाग, तसेच छत्तीसगडच्या बस्तर भागात गांजाची मोठ्या प्रमाणावर बेकायदा लागवड केली जात असल्याची माहिती तपासात मिळाली आहे. गांजा लागवड करण्यात आलेले भाग दुर्गम आहेत. दुर्गम भागातून महाराष्ट्रात विशेषत: मुंबई, पुणे या शहरात गांजा विक्रीस पाठविला जातो’, अशी माहिती गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली.
‘एकदम मोठ्या प्रमाणावर गांजा शहरात न आणता तस्कर वेगवेगळ्या मार्गाने गांजा विक्रीस पाठवितात. पुणे शहरातील दाट वसाहतीत हा गांजा पोहोचतो. तेथे गांजाचा साठा केला जातो. गांजा साठाही मोठ्या प्रमाणावर केला जात नाही. वेगवेगळ्या भागातील घरात गांजा साठविला जातो. तेलंगण, कर्नाटक, उत्तर प्रदेशात गांजा विक्रीस पाठविला जातो. हैदराबादमार्गे गांजा पुण्यात विक्रीस पाठविला जातो. गांजा पाकिटात किंवा छोट्या पिशवीत भरून तस्कर दुचाकीवररून येतात. काही प्रकरणात गांजा छुप्या पद्धतीने मालवाहू वाहनातून पाठवितात,’ असे गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.
गांजा कारवाई (२०२६ मार्च अखेरीपर्यंतची आकडेवारी)
जप्त केलेला गांजा – १६६ किलो
किंमत – ८६ लाख ५१ हजार रुपये
अटक आरोपी – ३१
