पुणे : पुणे शहर परिसरात राजस्थानातून अमली पदार्थांची तस्करीचा प्रकार गुन्हे शाखेने उघडकीस आणला. राजस्थानातील सहा जणांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून तीन कोटी ९२ लाख रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले.

मोतीसिंह श्रवणसिंह राजपुरोहित (वय २८), हरीष सुजना रामदेवासी (वय २२, रा. दोघेही वाघोली), योगेश उर्फ मनिष बाबुराम बिष्णोई (वय ३०, रा. चामु. जि. जोधपुर, राज्यस्थान), सचिन उर्फ एसके रमेशकुमार बिष्णोई (वय २०), अमित सुनिल घुले (वय ४०, रा. मांजरी), रतनलाल किष्णाराम जाट (वय २०), रामकरण जाट उर्फ चौधरी उर्फ सियाग (वय ३४) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अमली पदार्थ तस्करी प्रकरणात खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांनी दिली. परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त सोमय मुंडे या वेळी उपस्थित होते.

पुणे पोलिसांनी २०२४ मध्ये पुणे-सोलापूर रस्त्यावरील कुरकुंभ ओैद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यावर छापा टाकून मोठ्या प्रमाणावर मेफेड्रोनचा साठा जप्त केला होता. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अमली पदार्थ तस्करांवर करडी नजर ठेवण्याचे आदेश दिल आहेत. खराडी भागात अमली पदार्थ विक्री प्रकरणात आरोपी मोतीसिंह आणि हरीष यांना नुकतीच अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून १२ लाख रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. पोलिसांनी दोघांची चौकशी केली. तेव्हा राजस्थानातून मेफेड्रोन आणल्यची कबुली दोघांनी दिली. चौकशीत योगेश बिष्णाेई हा पुण्यात राजस्थानमधून मेफेड्रोन विक्रीसाठी आणणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडून ३० लाख रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले.

त्याचा मावस भाऊ सचिन बिष्णोई हा हडपसरमधील मांजरी परिसरात मेफेड्रोन विक्रीसाठी आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून चार लाख ६५ हजार रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले. सचिनची चौकशी करण्यात आली. तेव्हा मांजरीतील अमित घुले याला ७९ लाख रुपयांचे ३९८ ग्रॅम मेफेड्रोनची विक्री केल्याची माहिती मिळाली. घुले याला अटक करण्यात आली.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त पिंगळे, मुंडे, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. खराडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक पंडीत रेजीतवाड, सहायक निरीक्षक नितीनकुमार नाईक, रवींद्र गाेडसे, राहुल कोळपे, मनोज बागल, नितीन राठोड, अमोल ढोणे यांच्यासह तपास पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

राजस्थानात छापा; मुख्य पुरवठदार अटकेत

अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पुण्यातून अटक करण्यात आलेल्या आरोपींची एकत्रित चौकशी करण्यात आली. तेव्हा राजस्थानातील रतनलाल जाट याच्याकडून मेफेड्रोन खरेदी करुन त्याची पुण्यात विक्री करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांचे पथक राजस्थानात रवाना झाले. जाट याच्या घरावर छापा टाकून मेफेड्रोन जप्त केले, तसेच पुण्यातील अमली पदार्थ तस्करी प्रकरणात गेल्या काही महिन्यांपासून फरारी असलेला रामकरण जाट यालाही अटक करण्यात आली.

‘मोबाइल शाॅपी’च्या आड अमली पदार्थ विक्री

आरोपी मोतीसिह आणि हरीष यांनी वाघोलीत मोबाइल शाॅपी आणि गिफ्ट हाऊस सुरू केले होते. गेल्या वर्षभरापासासून दोघे जण मेफेड्रोन विक्री करत होते, अशी माहिती पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांनी दिली. या कारवाईत आरोपींकडून तीन कोटी ९२ लाख रुपयांचे एक हजार ९६० ग्रॅम मेफेड्रोन जप्त केले. मेफेड्रोनसह मोबाइल संच, महागडी मोटार, तसेच मोटार असा चार कोटी २७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे.