पुणे : ‘वर्षातील शंभर दिवस कुठला ना कुठला सण, उत्सव किंवा कार्यक्रम सुरू असतो. या काळात होणाऱ्या ध्वनिप्रदूषणामुळे सर्वसामान्य पुणेकर त्रस्त होत आहेत. त्यामुळे आगामी दहीहंडी आणि गणेशोत्सवासह वर्षभरातील सर्वच सण-उत्सवांमध्ये आवाजासाठी ‘चार बेस, चार टॉप’ वापर करण्यासाठी परवानगी राहणार असून, ध्वनिमर्यादा नियंत्रणात ठेवण्याचा नियम समान रीतीने लागू असेल, असे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले. ‘ध्वनिप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची इच्छा नसली, तरी कायद्याची अंमलबजावणी करणे ही पोलिसांची जबाबदारी आहे,’ असा इशाराही त्यांनी दिला.
पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या वतीने गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित दहीहंडी व गणेशोत्सव मंडळांच्या विशेष समन्वय बैठकीत अमितेशकुमार बोलत होते. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांच्यासह महापालिका व पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, दहीहंडी व गणेश मंडळांचे पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अमितेशकुमार म्हणाले, ‘ध्वनीिप्रदूषणाच्या नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत असल्याने सण-उत्सवांमध्ये शिस्तीचे वातावरण निर्माण करण्यासाठी काही मर्यादा घालणे आवश्यक आहे. सर्व सण, उत्सव आणि कार्यक्रमांसाठी निश्चित करण्यात येणाऱ्या अटी लिखित स्वरूपात देण्यात येतील. कोणताही सण किंवा उत्सव असला तरी त्याबाबतची भूमिका समान राहणार आहे. सर्व सण-उत्सवांसाठी एकच नियम आणि एकसमान भूमिका ठेवून ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्याचा प्रयत्न केला जाईल. प्लाझ्मा, प्रेशर मिड आणि ६ किंवा ८ बेस-टॉपच्या भिंती लावल्यास आवाजाची मर्यादा थेट १०० ते १०५ डेसिबलच्या पार जाते. या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांनी स्वतःहून प्लाझ्मा, प्रेशर मिड आणि लेझर लाईट न वापरण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. आता उत्सवाचा आनंद जपताना नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी ‘जास्तीत जास्त चार बेस आणि चार टॉप’ वापरून आवाज मर्यादित ठेवावा.’
‘सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी आणि वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी आपापल्या परिसरातील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांसोबत प्रत्यक्ष बैठका घ्याव्यात. वाहतूक नियोजन, गर्दीचे व्यवस्थापन, महिला व बालकांच्या सुरक्षेच्या उपाययोजना यांसारखे प्रश्न रस्त्यावर उतरून कार्यकर्त्यांच्या सहकार्याने सोडवावेत. वातानुकुलित कक्षात बसून निर्णय घेऊ नका,’ अशा स्पष्ट सूचना आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
पोलीस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले….
- मागील वर्षाच्या परवानग्या ग्राह्य धरून पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी वाहतूक विभागाशी समन्वय साधावा आणि अर्ज प्राप्त झाल्यानंतर २४ तासांच्या आत मंडळांना परवानग्या द्याव्यात. कार्यकर्त्यांना फेऱ्या मारायला लावू नका,
- लक्ष्मी रस्ता, टिळक रस्त्यासह प्रमुख मार्गांवरील आगमन व विसर्जन मिरवणुका संपवण्यापेक्षा त्या सुरळीत पार पडण्यावर प्रशासनाचा भर असेल. गर्दीचे योग्य व्यवस्थापन, चेंगराचेंगरी रोखणे आणि कायदा-सुव्यवस्था राखणे याला पोलिसांचे मुख्य प्राधान्य आहे.
- पुण्यातून अंमली पदार्थ पूर्णपणे हद्दपार करण्यासाठी गणेश मंडळांनी पुढाकार घ्यावा. सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या परिसरात अंमली पदार्थ मोहीम राबवावी, तसेच उत्सवकाळात अमली पदार्थ विरोधी प्रबोधनात्मक देखाव्यांना प्राधान्य द्यावे.
