माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील तरुणींच्या सुरक्षिततेसाठी पुणे पोलिसांकडून व्हॉट्स अ‍ॅप समूह सुरू करण्यात आला आहे. त्यापाठोपाठ महाविद्यालयीन तरुणींच्या समस्या सोडवण्यासाठी बडीकॉप व्हॉट्स अ‍ॅप समूह सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणा पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पत्रकार परिषदेत केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे पोलिसांकडून महिला आणि सुरक्षिततेसंदर्भात करण्यात आलेल्या विविध योजनांची दखल घेऊन फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (फिक्की)आणि विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशनकडून देण्यात येणारे ‘स्मार्ट पोलिसिंग अ‍ॅवॉर्ड २०१७’ पारितोषिक नवी दिल्ली येथे झालेल्या एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आले. खासदार मीनाक्षी लेखा यांच्या हस्ते पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना पारितोषिक प्रदान करून गौरविण्यात आले. त्या अनुषंगाने पत्रकारांशी बोलताना शुक्ला म्हणाल्या की, स्मार्ट पोलिसिंग अ‍ॅवार्डसाठी संपूर्ण देशभरातील पोलीस दल तसेच निमलष्करी पोलीस दलांनी सहभाग नोंदवला होता. महिला सुरक्षा या विषयासाठी सतरा राज्यातील पोलीस दलांनी आणि सायबर सुरक्षा विषयासाठी सहा राज्यांतील पोलिसांनी सहभाग नोंदवला होता. पुणे पोलिसांकडून माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात के लेल्या उपाययोजनांची दखल घेण्यात आली आहे. पोलिसांनी महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले आहे. आयटी क्षेत्रातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी बडी कॉप व्हॉट्स अ‍ॅप समूह सुरू करण्यात आला आहे.

चंदननगर, हिंजवडी, येरवडा, हडपसर या चार पोलीस ठाण्यांकडून सुरू करण्यात आलेल्या व्हॉट्स अ‍ॅप समूहात दहा हजार संगणक अभियंता तरुणींनी सहभाग नोंदविला आहे. बडी कॉप व्हॉट्स अ‍ॅप समूहावर आलेल्या तक्रारींची दखल घेऊन पोलिसांकडून छेड काढणारे तसेच असभ्य वर्तन करणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. या व्हॉट्स अ‍ॅप समूहाला मिळणारा प्रतिसाद विचारात घेऊन महाविद्यालयीन तरुणींसाठी लवकरच पोलीस ठाण्यांच्या पातळीवर व्हॉट्स अ‍ॅप समूह सुरू करण्यात येणार आहे. जुलै अखेपर्यंत हा समूह कार्यान्वित होईल, असे त्यांनी सांगितले. सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम, सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे या प्रसंगी उपस्थित होते.

सिटीसेफ अ‍ॅप

आयटी क्षेत्रातील महिलांबरोबरच सामान्य माहिलांना संकटाच्या काळात पोलिसांकडे तातडीने तक्रार करता यावी, या विचाराने पुणे पोलिसांकडून सिटीसेफ अ‍ॅप तयार करण्यात येणार आहे. हे अद्याप विकसित करण्यात आले नाही. शहराच्या एखाद्या भागात महिलेसोबत अनुचित प्रकार घडल्यास ती मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून तक्रार करू शकेल. ही तक्रार तातडीने नजीकच्या पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस नियंत्रण कक्षापर्यंत पोहोचेल. समजा तक्रारीची दखल न घेतली गेल्यास त्याची माहिती तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचेल, असे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune police start whatsapp group for safety girl
First published on: 30-05-2017 at 03:12 IST