पुणे : विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणाच्या तपासासाठी सातारा येथे गेलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्यासह तिघांनी पर्यटनस्थळे पाहण्याचा आनंद लुटल्याचे उघडकीस आल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकाऱ्यासह तिघांची दोन वर्षे वेतनवाढ रोखण्याची शिक्षा दिली.

खातेनिहाय शिक्षा सुनावलेली महिला पोलीस उपनिरीक्षक, हवालदार, महिला पोलीस कर्मचारी हे विश्रामबाग पोलीस ठाण्यात नियुक्तीस आहेत. विश्रामबाग पोलीस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षकाकडे सोपविण्यात आला होता.

घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी ४ एप्रिल रोजी पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार आणि महिला पोलीस शिपाई हे सातारा येथे तक्रारदार महिलेसह गेले. सातारा येथे पोहोचल्यानंतर पोलिसांनी जवळच्या पोलीस ठाण्याला याबाबतची माहिती कळवून त्यांची मदत घेणे घेऊन तपास करणे गरजेचे होते. मात्र, त्यांनी तसे केले नाही. एका ढाब्यावर त्यंनी जेवण केले. त्यानंतर दुपारी सव्वातीनच्या सुमारास सातारा शहरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात ते गेले. पंचनामा करताना घटनास्थळाच्या परिसरातील रहिवाशांकडे चौकशी किंवा तपास केला नाही. या घटनेची नोंद साताऱ्यातील संबंधित पोलीस ठाण्यात करणे गरजेचे होते. त्यानंतर त्यांनी पुण्यात येणे अपेक्षित होते. मात्र, महिला पोलीस अधिकारी, हवालदार, शिपाई हे कास पठार येथे गेले. त्या वेळी तक्रारदार महिला त्यांच्यासोबत होती. ‘माझी आई आजारी आहे.ती एकटी घरी आहे. मला लवकर घरी पोहोचणे गरजेचे आहे’, असे तक्रारदार महिलेने त्यांना सांगितले. पोलिसांकडे त्यांनी विनंती केली.

कास पठार; तसेच अन्य पर्यटनस्थळे पाहण्याचा आनंद लुटल्यानंतर पोलीस पथक एका महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी जेवण करण्यासाठी गेले. त्यानंतर रात्री एकच्या सुमारास ते पुण्यात पाेहोचले. सुरुवातीला तक्रारदार महिलेला स्वारगेट येथेच सोडण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. महिलेने विनंती केल्यानंतर तिला नारायण पेठ पोलीस चौकीत सोडून पोलीस निघून गेले.

महिलेने याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दिली. संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्यासह तिघांची चौकशी करण्यात आली. चौकशीत संबंधित प्रकार उघडकीस आला.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश काय?

‘महिला पोलीस उपनिरीक्षकासह तिघा जणांनी सातारा येथे जाऊन कोणत्याही प्रकारचा तपास केला नाही. मोघम स्वरूपाचा तपास केला. ते पर्यटनस्थळे पाहण्यात दंग होते. त्यांनी तक्रारदारालाही बरोबर नेले. मात्र, गु्न्ह्याचा तपास केला नाही. मौजमजा केली. संबंधित पोलिसांनी कर्तव्यात बेजबाबदारपणा दाखविला. बेशिस्त, निष्काळजीपणाच्या वर्तनामुळे पोलीस दलाची प्रतिमा जनमानसात मलीन होईल, असे कृत्य केले,’ असा ठपका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठेवला आहे.