प्रत्येक गावाची ओळख विशिष्ट खाद्यपदार्थ, उत्पादने, धार्मिक स्थळांमुळे निर्माण होते. महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेजवळ असलेले उमराटी गाव हे तेथे तयार होणाऱ्या देशी बनावटीच्या पिस्तुलांमुळे कुप्रसिद्ध झाले. तेथील स्थानिक कारागीर पिस्तुले तयार करून महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, पंजाबमधील सराईतांना विकतात. राज्यभरातील गंभीर गुन्ह्यांत उमराटी गावात तयार करण्यात आलेल्या पिस्तुलांचा वापर झाल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांच्या भाषेत या गावाची ओळख ‘व्हिलेज ऑफ पिस्टल’ अशी झाली आहे. पिस्तुलांचे गाव अशी ओळख असलेल्या या गावात पुणे पोलिसांच्या विशेष पथकाने कारवाई केली. या कारवाईमुळे उमराटी चर्चेत आले आहे.

गुंड टोळ्यांमधील संघर्षामुळे १९८० ते ९० च्या दशकात मुंबई चर्चेत आली होती. मुंबईमधील संघटित गुन्हेगारीचे भीषण वास्तव समाजासमोर आले. मुंबईतील गुन्हेगारीवर बेतलेले चित्रपटही लोकप्रिय झाले. मुंबई पोलिसांनी गुंड टोळ्यांचे म्होरके आणि साथीदारांना चकमकीत ठार मारले आणि मुंबईतील गुन्हेगारी अधोविश्व (अंडरवर्ल्ड) थोडे शांत झाले. मात्र, मुंबईनंतर राज्यातील महत्त्वाचे शहर असलेले पुणे हे गेल्या काही वर्षांपासून गुंड टोळ्यांच्या संघर्षामुळे चर्चेत आले आहे.

एके काळी पेन्शनरांचे शहर अशी ओळख असलेल्या पुण्यात भरदिवसा वर्चस्व, आर्थिक वादातून सराईतांचे खून होण्याच्या घटना घडल्या. १९९० नंतर पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात जमिनींना सोन्याचा भाव आला. उद्योगविश्वाचा विस्तार झाला. शहराची भरभराट होत असताना गुंड टोळ्यांनी जमीन व्यवहारांत हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली. गुंड टोळ्यांना जमीन व्यवहारांतून आर्थिक रसद मिळाली. गुंडांनी राजकीय क्षेत्रात बस्तान बसविले. त्यापैकी काही जण नगसेवक झाले. चाकू-सुऱ्यांच्या मारामारीत पुण्यातील सराईतांनी बेकायदा देशी बनावटीची पिस्तुले वापरण्यास सुरुवात केली. प्रदीप सोनवणे, संदीप मोहोळ, अनिल मारणे, सुधीर रसाळ, शरद मोहोळ, वनराज आंदेकर यांच्या खुनांत पिस्तुलांचा वापर करण्यात आला.

पिस्तुलांतून गोळीबार आणि कोयत्याने वार करून सराइतांचे भरदिवसा खून करण्याच्या घटना वाढल्या. अगदी किरकोळ वादातून पुण्यात एकमेकांवर पिस्तुले उगारून गोळीबार करण्यात आल्याच्या घटना घडल्या. दत्तवाडी पोलीस ठाण्यातून बाहेर पडलेल्या एका सराइताच्या भावावर गुंड नीलेश घायवळ टोळीने हल्ला केला. पर्वतीपासून दांडेकर पुलापर्यंत पाठलाग करून एखाद्या चित्रपटात शोभेल अशा दृश्याप्रमाणे पिस्तुलातून गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेत सराइताच्या भावाचा मृत्यू झाला आणि तेव्हाच पुण्यातील टोळीयुद्धाचे भीषण वास्तव समोर आले. संदीप मोहोळचा गजबजलेल्या पौड फाटा चौकात भरदिवसा खून करण्यात आला. सिग्नलला मोटार थांबली असताना दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी मोटारीची काच फोडली. मोहोळवर पिस्तुलातून गोळीबार झाला. हल्लेखोरांच्या गोळीने मोहोळचा वेध घेतला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

वर्षभरापूर्वी गुंड शरद मोहोळ, माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा पिस्तुलातून गोळीबार करून खून करण्यात आला. त्यानंतर आंदेकर टोळीने वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा अवघा वीस वर्षांचा मुलगा आयुषचा खून केला. त्यानंतर आंदेकर टोळीने कोंढव्यात गणेश काळे याचा खून केला. काळे याच्यावरही पिस्तुलातून गोळीबार करून कोयत्याने वार करण्यात आले. घायवळ टोळीतील सराइतांनी कोथरूड भागात दहशत माजवून पिस्तुलातून गोळीबार केला होता.

गोळीबाराच्या घटना आणि टोळीयुद्धामुळे पुण्यातील गुन्हेगारी विश्वाची काळी बाजू उजेडात आली. ‘पुण्यात चाललंय तरी काय,’ असा प्रश्न सामान्यांच्या मनात उपस्थित झाला. गोळीबाराच्या घटना आणि खून प्रकरणात वापरलेली पिस्तुले मध्य प्रदेशातील उमराटी गावातील कारागिरांनी तयार केल्याची माहिती पाेलिसांना तपासात मिळाली आणि पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मुळावर घाव घालण्याचे निश्चित केले. त्यानंतर पुणे पोलिसांच्या पथकाने शनिवारी पहाटे तेथे छापा टाकून पिस्तुले तयार करण्याचे कारखाने उद्ध्वस्त केले. याप्रकरणी सात जणांना अटक केली. तेथून देशी बनावटीची पिस्तुले, काडतुसे, पिस्तूल तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी यंत्रसामुग्री जप्त करण्यात आली.

गोळीबार, कोयते उगारून दहशत माजविण्याच्या घटनांमुळे शहराची प्रतिमा डागाळली आहे. शहरात देशी बनावटीची पिस्तुले सहजतेने उपलब्ध होत असल्याने बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्यांची संख्या मोठी आहे. गेल्या पाच वर्षांत पुणे पोलिसांनी सराइतांकडून ५०० पेक्षा जास्त पिस्तुले जप्त केली. या प्रकरणात सराइतांना अटक करण्यात आली. या आकडेवारीतून पुण्यात पिस्तूल मिरविण्याची हौस वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. खून आणि गोळीबाराच्या घटनांमुळे पुण्याच्या लौकिकाला बट्टा लागला आहे. हा बट्टा पुसण्यासाठी पोलिसांनी उमराटी गावातील शस्त्र कारखान्यांवर छापा टाकून मुळावर घाव घातला आहे. पुणे पोलिसांची कारवाई धाडसी आणि कौतुकास्पद आहे. या कारवाईत सातत्य ठेवल्यास पिस्तुले बाळगणाऱ्या सराइतांना चाप बसेल आणि गंभीर गुन्ह्यांना आळा बसेल.

rahul.khaladkar@expressindia.com