अनेक पोलिसांकडून अर्जही सादर नाही

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिस दलात टिकून राहण्यासाठी मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्ती महत्त्वाची असते. किंबहुना तंदुरुस्तीच्या बळावरच पोलिस दलात नोकरी मिळते. पोलिस दलात भरती झाल्यानंतर ताणतणावाखाली वावरणाऱ्या पोलिसांचे तंदुरुस्तीकडे दुर्लक्ष होते. त्यातून उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार अशा विकारांना पोलिसांना सामोरे जावे लागते. पोलिस दलात तीस वर्ष पूर्ण केलेल्या पोलिस शिपाई तसेच अधिकाऱ्यांनी तंदुरुस्तीकडे दुर्लक्ष करू नये, म्हणून राज्य शासनाकडून दरमहा फिटनेस भत्ता देण्याची सुरुवात करण्यात आली होती. मार्चअखेरीपर्यंत फिटनेस भत्ता मिळण्यासाठी लागणारे प्रमाणपत्र किंवा अर्ज सादर करणारे पोलिस या भत्त्यासाठी पात्र ठरतात. पुणे पोलिस दलातील पोलिसांनी या भत्त्यासाठी प्रयत्न केले नसल्याची माहिती समोर आली आहे.

तंदुरुस्ती आणि पोलिस या एकाच नाण्याच्या दोन बाजू मानल्या जातात. अन्य शासकीय सेवांमध्ये तंदुरुस्तीला विशेष महत्त्व दिले जात नाही. पोलिस दलात भरती होण्यासाठी शारीरिक चाचणी घेतली जाते. तंदुरुस्ती आणि लेखी परीक्षेतील गुणांवर पोलिस दलात नोकरी मिळते. पोलिस दलात अनेकांचे तंदुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने तंदुरुस्तीसाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून दरमहा पगारात अडीचशे रुपये फिटनेस भत्ता देण्याचा निर्णय गृहखात्याकडून घेण्यात आला होता. हा भत्ता मिळवण्यासाठी अनेक पोलिस प्रयत्नच करत नाही. किंबहुना अनेक पोलिस फिटनेस भत्त्यावर पाणी सोडतात. पोलिस दलातील नवीन भरती होणारे शिपाई हा भत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. साधारणपणे तीस वर्षांच्या पुढील पोलिस हा भत्ता मिळवण्यासाठी फारसे प्रयत्न करत नाहीत, अशी माहिती सूत्रांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

मार्च महिन्याच्या सुरुवातीला शहरातील विविध पोलिस ठाणी तसेच गुन्हे शाखेत फिटनेस भत्ता मिळवण्यासंदर्भातील सूचना जारी करण्यात येते. पोलिसांच्या दैनंदिन सूचना पत्रकात (गॅझेट) ही माहिती प्रसिद्ध करण्यात येते. हा भत्ता मिळवण्यासाठी अर्ज करणाऱ्या पोलिसांची खासगी वैद्यकीय रुग्णालयात तपासणी करण्यात येते. प्राथमिक तपासणी केल्यानंतर पोलिसांना प्रमाणपत्र देण्यात येते. हे प्रमाणपत्र पोलिस ठाणे किंवा गुन्हे शाखेतील घटकांमार्फत पोलिस मुख्यालयातील अधिकाऱ्यांना सादर करावे लागते. फिटनेस भत्ता मिळवण्यात पात्र ठरणाऱ्या पोलिसांची यादी शासनाकडे सादर करण्यात येते. त्यानंतर पोलिसांच्या मासिक वेतनात या भत्त्याचा समावेश केला जातो. पोलिस शिपाई आणि अधिकाऱ्यांसाठी हा भत्ता वेगवेगळा असतो, अशी माहिती पोलिस मुख्यालयाचे पोलिस उपायुक्त अरविंद चावरीया यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

फिटनेस भत्ता मिळवण्याबाबत अर्ज करणाऱ्या पोलिसांची केईएम. रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात येते. ही तपासणी रुग्णालयाकडून विनामूल्य करून दिली जाते. त्यामुळे फिटनेस भत्ता मिळवणाऱ्या पोलिसांना वैद्यकीय तपासणी करण्यासाठी खर्च करावा लागत नाही. समजा एखादा पोलिस फिटनेस भत्ता मिळवण्यात अपात्र ठरत असेल, तर वैद्यकीय तपासणीमुळे त्याला संभाव्य विकारांची जाणीव किंवा माहिती होते. त्याद्वारे तो पुढील वैद्यकीय उपचार करू शकतो. फिटनेस भत्ता मिळवण्याबाबत पोलिस निरुत्साही आहेत. हा भत्ता मिळवणाऱ्या पोलिसांचे प्रमाण कमी आहे. ते वाढायला हवे. 

अरिवद चावरीया, पोलिस उपायुक्त (मुख्यालय एक)

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune police uninterested for fitness allowance
First published on: 06-04-2017 at 02:21 IST