पुणे : पुणे शहरातील नाना पेठेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचा 1 सप्टेंबर 2024 मध्ये गणेश कोमकर याच्या टोळीतील गुंडांनी गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून खून केला होता.या घटनेला वर्ष पूर्ण होताच,आरोपी गणेश कोमकर चा मुलगा आयुष कोमकर याचा गोळ्या झाडून आंदेकर टोळीतील दोघांनी खून केल्याची घटना घडली होती.त्या घटनेनंतर दोन्ही टोळ्यातील अनेक आरोपींना पुणे पोलिसांनी अटक केली.हे टोळी युद्ध थांबत नाही तोवर आता पुन्हा एकदा आंदेकर आणि कोमकर टोळी युद्ध पाहण्यास मिळाले आहे.

वनराज आंदेकरच्या खुनात वापरलेली पिस्तुले समीर काळे याने मध्यप्रदेशातून आणली होती.तर समीर काळे हा सध्या कारागृहात असून त्याचा भाऊ गणेश काळे हा आज दुपारच्या सुमारास कोंढवा भागातील खडी मशीन चौकातील पेट्रोल पंपापासून रिक्षा घेऊन जात होता.त्यावेळी दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांनी गणेश काळे वर गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून खून केल्याची घटना घडली.त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. तर या खुनाच्या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.

गणेश काळे खून प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांची पथके विविध भागात रवाना करण्यात आली होती.तर खून झालेल्या घटना स्थळ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरा च्या माध्यमांतून देखील आरोपींचा शोध घेतला जात असताना,साताऱ्याच्या दिशेने पळून जाणार्‍या चार आरोपींना खेड शिवापूर येथून अमन शेख,अरबाज पटेल यांच्यासह दोन अल्पवयीन अशी एकूण चार जणांना अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आले असून अधिक तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.