पुणे : शहरातील कायदा-सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पुणे पोलीस दलातील शेकडो वाहनांसोर इंधन संकट उभे राहिले आहे. पुणे पोलिसांच्या मोटार परिवहन विभागातील डिझेल साठा संपल्याने पुढील आदेश मिळेपर्यंत कोणतेही पोलीस वाहन शिवाजीनगर येथील मोटार परिवहन विभागात डिझेल भरण्यासाठी पाठवू नये, असे आदेश देण्यात आले आहेत.

याबाबतचे परिपत्रक शनिवारी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांतील प्रमुख, तसेच विविध विभागांच्या प्रमुखांना पाठविण्यात आले. मोटार परिवहन विभागाकडून हे परिपत्रक काढण्यात आले. ‘मोटार परिवहन विभागाकडे सध्या पेट्रोल साठा उपलब्ध आहे. डिझेल साठा संपल्याने पुढील आदेश मिळेपर्यंत वाहने शिवाजीनगर येथील मोटार परिवहन विभागात पाठवू नयेत,’ असे आदेशात म्हटले आहे.

पुणे पोलिसांच्या ताफ्यात डिझेलवरील ३०० वाहने आहेत. यामध्ये गस्त घालणाऱ्या गाड्या, गुन्हे शाखेतील गाड्या, वाहतूक शाखेच्या गाड्या, दंगल नियंत्रक पथक, तसेच शहरातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या गाड्यांचा समावेश आहे.‘डिझेल कधी उपलब्ध होणार, याबाबतची माहिती देण्यात आलेली नाही. डिझेल साठा संपल्यानंतर पुणे पोलिसांच्या दैनंदिन कामकाज, तसेच गस्तीवर परिणाम होण्याची शक्यता आहे,’ अशी माहिती सूत्रांनी दिली.