पुणे : सामाजिक माध्यमांवर रील्सद्वारे अफवा पसरवणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला आहे. पुणे शहरातून तरुणींचे अपहरण करणारी टोळी सक्रिय झाल्याची आणि गेल्या काही दिवसांत १२३ तरुणींचे अपहरण झाल्याची चुकीची माहिती देणारी ‘रील’ प्रसिद्ध झाल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हा इशारा दिला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘अशा प्रकारच्या चित्रफितींमध्ये तथ्य नाही. संबंधित चित्रफीत, चित्रीकरण करण्याचे ठिकाण, ज्या खात्यातून ही चित्रफीत प्रसारित करण्यात आली आहे, त्या बाबत तांत्रिक तपास करण्यात येत आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या चित्रफितींवर विश्वास ठेऊ नये. अफवा प्रसारित करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल.’
‘समाजमाध्यमात प्रसारित झालेल्या चित्रफितीच्या अनुषंगाने गुन्हे शाखा, पोलीस ठाण्यांकडून तपास करण्यात आला. संबंधित चित्रफीत प्रसारित करणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधून माहिती घेण्यात आली. पोलिसांनी ज्या भागात ही चित्रफीत तयार करण्यात आली होती, तेथील सोसायटीतील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती घेतली. पुणे शहरात अशा प्रकारची कोणतीही घटना घडली नसल्याची माहिती चौकशीत मिळाली,’ अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गौहर हसन यांनी दिली.
पुणे शहरातून तरुणींचे अपहरण करणारी चित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी सखोल तपास केला. अशा प्रकारची घटना पुणे शहरात घडली नसल्याची माहिती चौकशीत मिळाली. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या चित्रफितींवर विश्वास ठेऊ नये. अफवा पसरविणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल. – गौहर हसन, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा, पुणे पोलीस
