pune police will take action against criminals who supported minor to involve in crime pune print news rbk 25 zws 70 | Loksatta

पुण्यात कोयता गँगच्या मुळावर घाव ! अल्पवयीन मुलांना पाठबळ देणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर पोलीस करणार कारवाई

पोलीस ठाण्यांच्या पातळीवर अल्पवयीन मुलांचे समुपदेशन करण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

pune police Commissioner Ritesh Kumar,
पोलीस आयुक्त रितेश कुमार (संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

पुणे : शहरात भरदिवसा कोयते उगारून दहशत माजविणाऱ्या अल्पवयीन मुलांची गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी व्यूहरचना आखली आहे. अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीत ओढणाऱ्या तसेच त्यांना पाठबळ देणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर करडी नजर ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

शहर तसेच उपनगरात गेल्या दोन महिन्यांपासून कोयते उगारून दहशत माजविण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. वेगवेगळ्या भागात दहशत माजविणाऱ्या कोयता गँगमधील बहुतांश आरोपी अल्पवयीन आहेत. अल्पवयीन मुलांच्या विरोधात कारवाई करताना पोलिसांना बाल गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यामुळे मर्यादा येतात. त्यामुळे बाल गुन्हेगारी प्रतिबंध कायद्यातील कठोर तरतुदींचा आधार घेऊन अल्पवयीन मुलांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत. तसेच, गुन्हेगारीकडे वळलेल्या अल्पवयीन मुलांचे समुपदेशन करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. पोलीस ठाण्यांच्या पातळीवर अल्पवयीन मुलांचे समुपदेशन करण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> पुणे : सीटीईटी उमेदवारांना अभियोग्यता चाचणीची संधी; कागदपत्रे सादर करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

अल्पवयीन मुलांमघ्ये गुन्हेगारीचे आकर्षण आहे. त्यामुळे अनेक अल्पवयीन मुले परिसरातील गुंड टोळ्यांच्या संपर्कात आली आहेत. समाजात प्रभाव पाडण्यासाठी अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळाली आहेत. अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीत ओढणाऱ्या तसेच त्यांना पाठबळ देणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या विरोधात कारवाई करणे तसेच त्यांना समज देण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असल्याची माहिती गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली.

अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यातील सहभागाची माहिती संकलित अल्पवयीन मुलांचा गंभीर गुन्ह्यातील सहभागाची माहिती संकलित करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. विविध गंभीर गु्न्ह्यात १६ ते १८ वयाेगटातील मुले सामील झाली आहेत. गेल्या सहा महिन्यात ४२ गुन्ह्यांमध्ये सामील झालेल्या अल्पवयीन मुलांची चौकशी करण्यात आली. तेव्हा त्यांनी कोणाच्या तरी सांगण्यावरून गुन्हे केल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या वर्षी गंभीर स्वरूपाच्या ३०३ गुन्ह्यात ४७६ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले होते. पाेलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनखाली गुन्हे शाखेतील पथकांनी गुन्हेगारी टोळ्यांमधील अल्पवयीन मुलांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू केले आहे.

अल्पवयीन मुलांना गुन्हेगारी करण्यासाठी पाठबळ देणाऱ्या सराइतांची माहिती घेण्यात आली आहे. अल्पवयीन मुलांवर गुन्हेगारी करण्यास प्रवृत्त करणाऱ्या सराइतांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार आहे. – रितेश कुमार, पोलीस आयुक्त

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 17:15 IST
Next Story
कसबा पोटनिवडणूक : हिंदू महासंघ संघटनेच्या आनंद दवेंचा उमेदवारी अर्ज दाखल