पुणे : पूनावाला स्टड फार्ममध्ये शिरलेल्या चाेरट्यांनी रखवालदारांना मारहाण करुन चंदनाची चार झाडे कापून नेल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी चंदन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
याबाबत परमेश्वर हिरामण कोळी (वय ४०, रा. जिल्हा परिषद शाळेजवळ, लोणी काळभोर, पुणे-सोलापूर रस्ता) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर रस्त्यावर थेऊर परिसरात पूनावाला स्टड फार्म आहे. चार दिवसांपूर्वी मध्यरात्री चार चोरटे पूनावाला स्टड फार्मच्या भिंतीवरुन उड्या मारुन शिरले. स्टड फार्ममधील रखवालदार कुंदन शर्मा, सरजित सिंग, इंद्रजित गुप्ता यांना मारहाण केली. त्यांना शास्त्राचा धाक दाखवून चोरट्यांनी चंदनाची चार झाडे कापून नेली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या चंदन चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के तपास करत आहेत.
शहर परिसरात वर्षभरापासून चंदन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोरट्यांनी बंगले, सोसायटी, तसेच शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्थांच्या आवारात शिरून चंदनाची झाडे कापून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. विधी महाविद्यालय रस्त्यावर चंदन चोरट्यांनी मध्यरात्री गस्त घालणाऱ्या चांदन चोरट्यांवर हल्ला केल्याची घटना गेल्या वर्षी घडली होती. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात चंदन चोरटा जखमी झाला होता. या प्रकरणात चंदन चोरट्यांना डेक्कन पाेलिसांनी अटक केली होती. डेक्कन जिमखाना भागात बंगल्यात शिरुन चोरट्यांनी चंदनाची झाडे कापून नेली होती.
मोटारीतून गावठी दारुची वाहतूक करणारे अटकेत
मोटारीतून गावठी दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना वानवडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून गावठी दारू असलेले प्लास्टिक कॅन जप्त करण्यात आले आहे.
लियाकत रोहित अब्बासी (वय ३२, रा. ढोबरवाडी , सोपानबाग, घोरपडी), समीर संजय राठोड (वय २३, रा. शिंदवणे काळेशिवार, ता. हवेली ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. वानवडी पोलीस ठाण्याचे पथक होळीच्या पार्श्वभूमीवर गस्त घालत होते. त्या वेळी अब्बासी आणि राठोड हे मोटारीतून गावठी दारू वाहतूक करत असल्याची माहिती तपास पथकातील पोलीस हवालदार दया शेगर आणि अभिजित चव्हाण यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून मोटार अडवली. मोटारीतून १२ प्लास्टिक कॅन जप्त करण्यात आले.
कॅनमध्ये ४२०लिटर गावठी दारू होती. होळी, धुळवडीला दारूला मागणी वाढत असल्याने आरोपी अब्बासीने एकाच्या सांगण्यावरून समीर राठोड याच्याकडून दारू खरेदी केल्याची माहिती चौकशीत दिली. वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील पोलीस निरीक्षक संगीता जाधव, सहायक निरीक्षक उमाकांत महाडिक, उपनिरीक्षक अल्फाज शेख, महेश गाडवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, आशिष कांबळे, अमोल गायकवाड, गोपाळ मदने, विष्णू सुतार, अभिजित चव्हाण, बालाजी वाघमारे, विठ्ठल चोरमले, अर्शद सय्यद यांनी ही कामगिरी केली.
