पुणे : कल्याणीनगरमधील अपघातातील पोर्श मोटार विनानोंदणी रस्त्यावर धावत असल्याची बाब उघड झाली आहे. यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) विनानोंदणी रस्त्यावर धावत असलेल्या वाहनांवर कारवाई सुरू केली आहे. अशी वाहने आढळल्यास त्याची विक्री करणाऱ्या वितरकाचा व्यवसाय परवाना निलंबित करण्याचे पाऊल आरटीओने उचलले आहे.

कल्याणीनगरमधील अपघातातील पोर्श मोटारीची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली नव्हती. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आरटीओतील वाहननोंदणीच्या प्रक्रियेबाबतही शंका उपस्थित केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर आरटीओने शहरातील रस्त्यांवर धावणाऱ्या विनानोंदणी वाहनांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. आरटीओच्या भरारी पथकांकडून ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा >>>१२वीचा निकाल ९३.३७ टक्के; कोकण पुन्हा अव्वल, मुंबई सर्वांत मागे,सव्वातेरा लाख विद्यार्थी उत्तीर्ण

शहरातील रस्त्यावर विनानोंदणी वाहन दिसल्यास कारवाई केली जात आहे. ही कारवाई वाहनाची विक्री करणाऱ्या वितरकावर केली जात आहे. वितरकांना याबाबत आरटीओने सूचनाही दिल्या आहेत. वितरकाने विनानोंदणी वाहन ग्राहकाला देऊ नये, असेही बजावण्यात आले आहे. विनानोंदणी वाहन दिसल्यास वितरकांना व्यवसाय परवाना निलंबित केला जाणार आहे. हा परवाना १५ दिवसांपासून ६ महिन्यांच्या कालावधीपर्यंत निलंबित केला जाणार आहे.

शहरातील वितरकांना विनानोंदणी वाहन ग्राहकांना देऊ नये, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. तरीही विनानोंदणी वाहन रस्त्यावर दिसल्यास संबंधित वितरकाचा परवाना निलंबित केला जाणार आहे.- संजीव भोर, प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी

विनानोंदणी वाहनांची आकडेवारीच नाही

शहरात विनानोंदणी किती वाहने आहेत याची आकडेवारी आरटीओकडे सध्या उपलब्ध नसल्याची बाबही उघड झाली आहे. वाहनाच्या नोंदणीची जबाबदारी विक्रीवेळी वितरकावर असते. वाहन इतर राज्यांतून आणले असल्यास तेथील वितरक तात्पुरती नोंदणी करून वाहन पाठवतो. त्यानंतर संबंधित आरटीओत नोंदणी करण्याची जबाबदारी वाहनमालकाची असते. शहरात अशा प्रकारे नोंदणी प्रक्रिया पूर्ण न झालेली किती वाहने धावत आहेत, याची माहिती आरटीओकडेही नाही.