“पुण्यातील अपघात प्रकरणात पालकमंत्री (पुणे जिल्हा) अजित पवार यांनी घेतलेली भूमिका ही खूप संशयास्पद आहे. त्यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत”, असं वक्तव्य शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. राऊत यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप केले. त्याचबरोबर पुणे अपघातप्रकरण लावून धरल्याबद्दल काँग्रेस नेते तथा कसबा-पेठचे आमदार रवींद्र धंगेकर यांचं कौतुक केलं. राऊत म्हणाले, “गेले अनेक दिवस धंगेकर यांनी हे प्रकरण लावून धरलं आणि यामधील आरोपींचा पर्दाफाश केला. त्याबद्दल त्यांचं कौतुक करायला हवं. तसेच या त्यांच्या संघर्षात आम्ही महाविकास आघाडी म्हणून त्यांच्याबरोबर आहोत.”

संजय राऊत म्हणाले, “बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल (अल्पवयीन आरोपीचे वडील) आणि त्याच्या कुटुंबाला वाचवण्यासाठी काही लोकांनी शासकीय यंत्रणेचा गैरवापर केला आहे. या सरकारची हीच नियती आहे. मग ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असोत, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असोत, अथवा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार असतील, या लोकांनी अग्रवाल बिल्डरला वाचवण्यासाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला आहे. त्याचबरोबर तिथला स्थानिक आमदार सुनील टिंगरे आणि ससून रुग्णालयाच्या फॉरेन्सिक विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना यात गुंतवलं होतं. या लोकांनी एका गुन्हेगाराला वाचवण्यासाठी यंत्रणा कामाला लावली. मात्र तिथले काँग्रेसचे आमदार (कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ) रवींद्र धंगेकर यांनी मात्र हा विषय लावून धरला आणि त्यांनी या प्रकरणातील गुन्हेगारांचा पर्दाफाश केला. रवींद्र धंगेकर यांनी या प्रकरणातील इतर गुन्हेगारांना जनतेसमोर आणलं. धंगेकर यांच्या या लढ्यात आम्ही महाविकास आघाडीचे सर्व नेते त्यांच्याबरोबर खंबीरपणे उभे आहोत.”

हे ही वाचा >> Porsche Accident: “माझ्या मुलीच्या मृत्यूला १२ दिवस झाले आहेत, आता…”; अश्विनीच्या आईचा सून्न करणारा सवाल

ठाकरे गटातील खासदार म्हणाले, “राज्यातलं सरकार अग्रवाल बिल्डर आणि त्याच्या गुन्हेगार मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, स्थानिक आमदार सुनील टिंगरे हे सर्वजण एका गुन्हेगाराला वाचवण्यासाठी धडपड करत आहेत. ज्याने मद्यप्राशन करून दोन खून केले, त्याला वाचवण्यासाठी या लोकांनी कशा पद्धतीने संपूर्ण यंत्रणा राबवली, ते आता समोर येऊ लागलं आहे. त्या गुन्हेगाराला वाचवण्यासाठी या लोकांनी खोटे पुरावे तयार करण्याचा प्रयत्न केला. यंत्रणेवर दबाव आणला. मात्र आता हे सगळं प्रकरण लोकांसमोर आलं आहे. हे प्रकरण लोकांसमोर आणण्यात आमदार रवींद्र धंगेकर यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी यासाठी गेले अनेक दिवस संघर्ष केला आहे आणि हे प्रकरण चव्हाट्यावर आणलं आहे. त्यांची ही कामगिरी अत्यंत कौतुकास्पद आहे.”