पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणी अद्यापही चौकशी सुरू असून अल्पवयीन मुलाचे आई वडील आणि आजोबा कोठडीत आहेत. मुलाच्या रक्तात अल्कोहोलचे प्रमाण आढळू नये म्हणून ससून रुग्णालयातील डॉक्टरांच्या मदतीने रक्ताच्या नमुन्यात फेरफार करण्यात आला होता. आता, या अपघातात मृत झालेल्यांच्या विसेरा रिपोर्टमध्ये अल्कोहोल पॉझिटिव्ह सापडावेत याची तयारी झाली असल्याची धक्कादायक माहिती राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. त्यांनी एक्सवर यासंदर्भातील पोस्ट लिहिली आहे.

या अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने नष्ट करण्यात आले असून त्याजागी त्याच्या आईचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. परंतु, याचा अहवाल समोर आल्यानंतर त्यादृष्टीने तपासणी सुरू झाली. तसंच, रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि अल्पवयीन मुलाची आई शिवानीअग्रवाल यांना अटक करण्यात आली. परंतु, आता त्याही पुढे जाऊन या प्रकरणात मृत झालेल्या तरुण-तरुणींचा दोष असल्याचे सिद्ध करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं अनिल देशमुख म्हणाले आहेत.

हेही वाचा >> Pune Porsche Accident : अगरवाल दाम्पत्यासह तिघांच्या पोलीस कोठडीत वाढ

अनिल देशमुख एक्स पोस्टमध्ये म्हणाले, “पुणे हिट ॲन्ड रन प्रकरणामध्ये राजकीय दबावाखाली आरोपीचे रक्ताचे नमुने बदलून आरोपी दारू न पिल्याचा अहवाल तयार करण्याचे प्रयत्न झाले,हे उघड झाले आहे. आता माजी गृहमंत्री म्हणुन माझी माहिती अशी आहे की, मृतकांच्या Viscera Report मध्ये Alcohol +ve यावे याकरिता पूर्णपणे तयारी झाली आहे. जेणेकरुन या प्रकरणामध्ये मृत झालेले मोटरसायकल वरील तरुण तरुणी हे दारु पिऊन होते आणि त्यांच्यामुळेच हा अपघात झाला, असे न्यायालयात सिद्ध करता येईल. जेणेकरून विशाल अग्रवालचा मुलगा लवकर सुटेल, अशा पध्दतीने प्रयत्न सध्या सरू आहेत.”

विशाल अग्रवालच्या मुलाला वाचवण्यासाठी राज्य शासनाचा प्रयत्न

“तरुण तरुणीच्या विसेरा रिपोर्ट अल्कोहोल पॉझिटिव्ह यावा याकरता प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या रक्ताच्या नमुन्यात दारुचा अंश टाकण्यात आल्याची माझी खात्री आहे. विशाल अग्रवलाच्या मुलाचे ब्लड सॅम्पल बदलण्यात आले. त्यावेळी शासनाचा दबाव त्यावर कसा होता हे सर्वांना माहित आहे. तो प्रयत्न अयशस्वी झाल्याने विशाल अग्रवलाच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न राज्य शासन करत आहे, असा माझा खुला आरोप आहे”, असंही अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं.

हेही वाचा >> Pune Porsche Accident: कल्याणीनगर प्रकरणात निवृत्त लष्करी अधिकाऱ्याकडून अपघात प्रभाव मूल्यांकन

“हा प्रयत्न यशस्वी झाला तर जो आरोपी आहे त्याला सोडलं जाईल आणि जे या अपघातात मृत झाले आहेत त्यांना आरोपी केलं जाईल”, असंही ते म्हणाले.