पुण्यातील पोर्श कार अपघातातील अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. या अपघातप्रकरणी तपास करणाऱ्या पोलीस पथकाने विशाल आणि सुरेंद्र अग्रवाल या दोघांना आज पुणे जिल्हा न्यायालयासमोर हजर केलं. यावेळी न्यायालयाने या दोघांना ३१ मेपर्यंत कोठडी सुनावली आहे. यापूर्वी न्यायालयाने विशाल अग्रवाल यांना २८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आज त्यांनी पुन्हा एकदा जामीन अर्ज केला होता, जो न्यायालयाने फेटाळला आणि कोठडीत ३१ मेपर्यंत वाढ केली.

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यापूर्वी म्हटलं होतं की, अल्पवयीन आरोपीचे वडील न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान, त्याच्या आजोबांनी त्यांच्या वाहनचालकाला पैसे आणि भेटवस्तू देण्याचं अमिष दाखवून अपघाताचा आरोप स्वतःवर घेण्यास सांगितलं होतं. तसेच त्याच्यावर जबरदस्ती केली होती. त्यामुळे आम्ही त्याच्या आजोबांना म्हणजेच सुरेंद्र अग्रवाल यांना ताब्यात घेतलं आहे. आता सुरेंद्र अग्रवालही ३१ मेपर्यंत न्यायालयीन कोठडीत असतील.

पुण्यात बेदरकारपणे पोर्श कार चालवून दोघांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या वडिलांना पुणे सत्र न्यायालयाने आधी २४ मेपर्यंतची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर या कोठडीत २८ मेपर्यंत वाढ करण्यात आली आणि आता ही कोठडी ३१ मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. १९ मे रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास पुण्याच्या कल्याणीनगर परिसरात एका आलिशान पोर्श कारने दुचाकीला धडक दिली. या धडकेत अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया हे दोघे जागीच ठार झाले. १७ वर्षांचा अल्पवयीन मुलगा मद्यधुंद अवस्थेत पोर्श कार चालवत होता. आरोपी अल्पवयीन असल्यामुळे न्ययालयाने आधी त्याचा जामीन मंजूर केला आणि नंतर त्याची बालसुधारगृहात रवानगी केली आहे. दरम्यान, अल्पवयीन मुलाच्या हाती कार दिल्यामुळे त्याच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे.

हे ही वाचा >> शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करणार? शिक्षणमंत्री केसरकर म्हणाले, “तो श्लोक अतिशय चांगला…”

‘ससून’मधील ‘त्या’ दोन्ही डॉक्टरांना ३० मेपर्यंत कोठडी

या अपघातप्रकरणातील अल्पवयीन आरोपी मद्यधुंद अवस्थेत नव्हता हे सिद्ध करण्यासाठी ससून रुग्णालयाच्या फॉरेन्सिक विभागाच्या प्रमुखासह एका डॉक्टरने आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याचा आरोप करत पुणे पोलिसांनी रविवारी (२६ मे) मोठी कारवाई केली. पोलिसांनी ससूनमधील त्या दोन्ही डॉक्टरांसह फॉरेन्सिक विभागातील एका कर्मचाऱ्याला अटक केली. या दोन डॉक्टरांनी अल्पवयीन मुलाने मद्यप्राशान केलं नव्हतं असा अहवाल दिला होता. मात्र अपघाताच्या काही मिनिटे आधी त्या मुलाने एका पबमध्ये आणि बारमध्ये जाऊन मद्यप्राशन केलं होतं. त्याचे सीसीटीव्ही व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले होते. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी अधिक तपास केला. हा तपास ससूनच्या फॉरेन्सिक विभागापर्यंत येऊन थांबला आणि पोलिसांनी येथील दोन डॉक्टरांना अटक केली. डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर अशी या अटक केलेल्या डॉक्टरांची नावं आहेत. या दोघांना पोलिसांनी सोमवारी (२७ मे) न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयाने त्या दोघांची ३० मेपर्यंतची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.