पुणे : ग्राहकांना अधिक सुलभ, सोयीस्कर आणि दर्जेदार टपाल सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशातून पुणे टपाल विभागाच्या वतीने ‘पार्सल पिक-अप सेवा आपल्या दारी’ योजनेची सुरुवात करण्यात आली. पुणे विभागाच्या पोस्टमास्तर जनरल प्रीती अग्रवाल आणि टपाल सेवेचे संचालक अभिजित बनसोडे यांच्या उपस्थितीत बुधवारी ही सेवा सुरू करण्यात आली.
या नव्या सुविधेमुळे किरकोळ ग्राहकांना आता पार्सल पाठविण्यासाठी टपाल कार्यालयामध्ये येण्याची आवश्यकता राहणार नाही. ग्राहकांच्या विनंतीनुसार टपाल विभागाचे कर्मचारी ग्राहकांच्या घर, कार्यालय अथवा व्यावसायिक आस्थापनेतून पार्सल थेट स्वीकारतील. त्याची नोंदणी करून देशातील कोणत्याही ठिकाणी सुरक्षित व विश्वासार्ह पद्धतीने पाठवतील.
अग्रवाल म्हणाल्या, ‘टपाल विभाग नेहमीच ग्राहककेंद्रित सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे. पार्सल पिक-अप सेवा ही ग्राहकांच्या दारापर्यंत टपाल सेवा पोहोचविण्याच्या दिशेने उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या सुविधेमुळे ग्राहकांचा वेळ आणि प्रवासाचा खर्च वाचेल; तसेच पार्सल पाठविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ, जलद आणि सोयीस्कर होईल. बदलत्या काळातील ग्राहकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन टपाल विभागातर्फे सातत्याने आधुनिक आणि नावीन्यपूर्ण सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे.’
‘किरकोळ व्यापारी, लघु उद्योजक, ऑनलाइन विक्रेते, महिला उद्योजक, स्वयंरोजगार करणारे नागरिक तसेच नियमित पार्सल पाठविणाऱ्या ग्राहकांसाठी ही सेवा उपयुक्त ठरणार आहे. ग्राहकाभिमुख कार्यपद्धतीचे आणखी एक प्रभावी उदाहरण आहे, असे बनसोडे यांनी सांगितले.
कशा पद्धतीने उपलब्ध असेल ही सेवा?
ग्राहकांनी ‘पार्सल पिक-अप सेवा आपल्या दारी’ सुविधेचा लाभ घेण्यासाठी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगरपालिका हद्द (पुणे कॅन्टोन्मेंट, खडकी कॅन्टोनमेंट, येरवडा, हिंजवडी आय टी पार्क, हडपसर, एनआयबीएम, कोंढवा, भोसरी, मार्केट यार्ड) भागातील ग्राहकांनी ८४२१३७२३१७ या क्रमांकावर फोनद्वारे किंवा व्हॉट्स ॲपद्वारे संपर्क साधावा. तसेच पुणे महानगरपालिका हद्द (लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, डेक्कन, औंध, धनकवडी, नांदेड सिटी, कोथरूड) भागातील ग्राहकांनी ७०२८००७२२३ या क्रमांकावर फोनद्वारे किंवा व्हॉट्स ॲपद्वारे संपर्क साधावा. पुणे टपाल विभागाने सुरू केलेली ही नवी ग्राहकाभिमुख सेवा आजपासून पुणे शहरातील सर्व संबंधित टपाल कार्यालयांमार्फत उपलब्ध असून, नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
