पुणे : शहरातील अनेक ठिकाणी पदपथ नाहीत, तर असलेल्या पदपथांची दुरवस्था झाल्याचे चित्र आहे. कचरा-राडारोडा पडून आक्रसलेल्या आणि तुटलेल्या पदपथांवर चालणेही अवघड झाले असून, केलेल्या तक्रारी केवळ कागदावरच राहत असल्याने कवी अनिल यांच्या शब्दांत बदल करून पादचाऱ्यांसाठी ‘अडल्या वाटा, थकली पावले,’ अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसते.
पदपथांबाबत पादचाऱ्यांनी केलेल्या तक्रारीचे काय होते, याबाबतचा अहवाल परिसर या संस्थेने पुणे महापालिकेला सादर केला. संस्थेने ‘माय वॉक, माय राईट’ या उपक्रमांतर्गत २० फेब्रुवारी ते १६ मार्च दरम्यान पादचाऱ्यांनी नोंदवलेल्या समस्यांचा अभ्यास केला. अभ्यासासाठी औंध-बाणेर, कोथरूड-बावधन, शिवाजीनगर-गोखलेनगर, भवानी पेठ, कसबा-विश्रामबागवाडा या प्रभागांतील पदपथ समस्या निवडण्यात आल्याची माहिती संस्थेकडून निवेदनाद्वारे देण्यात आली.
या उपक्रमादरम्यान एक्स, व्हॉट्सॲप बॉट आणि पीएमसी केअर ॲप या महापालिकेच्या अधिकृत माध्यमांद्वारे ३०२ तक्रारी महापालिकेकडे नोंदवण्यात आल्या. त्यापैकी ११४ तक्रारी निकाली काढण्यात आल्या, तर ५९ तक्रारी प्रक्रियेत आहेत. पदपथ, अतिक्रमण आणि पादचारी सुविधांविषयक तक्रारींचे १५ दिवसांत निराकरण करण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर असते. विलंब झाल्यास या तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. प्रत्यक्षात मात्र नोंदवण्यात आलेल्या ३०२ तक्रारींपैकी केवळ २३ तक्रारी १५ दिवसांच्या कालावधीत सोडवण्यात आल्या आहेत. तसेच प्रलंबित तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येत नसल्याचे निरीक्षण या अहवालात नोंदविण्यात आले आहे.
अहवालातील ठळक मुद्दे
- एक्स या समाजमाध्यमावर तक्रार केल्यानंतर काही तासांत टोकन क्रमांक मिळणे अपेक्षित असते. मात्र, एक्सवरील ८६ पैकी ३८ तक्रारींनाच टोकन मिळाले. तर ४८ तक्रारींमध्ये टोकन मिळाले नाही.
- एक्स आणि पीएमसी केअर अपॅमध्ये छायाचित्र अपलोडची करण्याची सुविधा आहे. मात्र, व्हॉट्सॲप बॉटमध्ये हा पर्याय नाही. त्यामुळे व्हॉट्सॲपच्या माध्यमातून दृश्य पुराव्यांसह तक्रार नोंदवणे अवघड.
- १५ दिवस प्रलंबित राहिलेली तक्रार क्वचितच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवली जाते.
‘परिसर’च्या शिफारशी
- महापालिकेने तक्रार निराकरणाचे छायाचित्र, पुरावा देणे आवश्यक
- १५ दिवसांनंतरही न सुटलेल्या तक्रारी आपोआप वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपविण्याची जबाबदारी निश्चित करण्याची गरज
- प्रभाग अधिकाऱ्यांनी दरमहा तक्रारींचा आढावा घेणे आवश्यक
पुण्यात दरवर्षी सुमारे १२० पादचारी मृत्यू होतात. सुरक्षित आणि सुस्थितीत असलेल्या पदपथांची गरज आहे. महापालिकेची तक्रार नोंदवण्याची प्रणाली सुलभ आहे. मात्र, तक्रारींच्या निराकरणासाठी अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. काही प्रकरणांमध्ये विलंब, अपूर्ण प्रतिसाद आणि प्रक्रियात्मक मर्यादांमुळे ही यंत्रणा अपेक्षित परिणाम देऊ शकत नाही. – पौर्णिमा गभाले, अभ्यास समन्वयक, परिसर संस्था
