पुणे : अपर इंदिरानगर परिसरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याची एक चित्रफीत शिवसेना (शिंदे) पक्षाचे शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांनी समाजमाध्यमावर टाकून प्रशासनाला चांगलेच सुनावले आहे. खड्डे नाही म्हणता, ‘मग अख्खा माणूस गिळणारा खड्डा कुणाच्या कारभाराचा,’ अशी विचारणा भानगिरे यांनी केली आहे.
‘पुणे शहरात केवळ ५४ खड्डे असल्याचा दावा महापालिकेचा पथ विभाग करतो, मग अप्पर इंदिरानगरमधील रस्त्यावर माणूस अर्धा जाईल, हा एवढा मोठा खड्डा कुणाच्या मोजणीत का आला नाही? कागदावर ५४ खड्डे दाखवून प्रत्यक्षातील भयावह वास्तव झाकण्याचा प्रयत्न सुरू आहे का?
पुणेकरांच्या जिवाची किंमत एवढी स्वस्त झाली आहे का?, असे प्रश्न भानगिरे यांनी उपस्थित केले आहेत. शहरात यंदा कमी खड्डे असल्याचा दावा करणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना देखील भानगिरे यांनी सुनावले आहे. शहरात यांना कमी खड्डे असल्याचा दावा करणाऱ्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी एकदा रस्त्यावर उतरून खड्डे असल्याचा अनुभवच घ्यावा, असेही भानगिरे यांनी सत्ताधारी भाजपला सुनावले आहे.
शहरातील रस्त्यांवर केवळ ५४ खड्डे असल्याचा दावा महापालिकेच्या पत विभागाने केला होता. यावर देखील शिवसेनेच्या वतीने टिकास्त्र सोडण्यात आले आहे. खड्डे पडलेल्या रस्त्यांवरून वाहने चालवताना पुणेकरांचे कंबरडे मोडत आहे. मात्र त्याची कोणतीही जाणीव महापालिका प्रशासनाला नसल्याचे भानगिरे यांनी सांगितले.
‘रस्त्यांची कामे वारंवार निकृष्ट ठरणे, खड्डे पुन्हा पडणे आणि एकाच ठेकेदाराला कामे मिळणे यामागे नेमके कोणाचे हितसंबंध आहेत, याचा खुलासा पुणेकरांसमोर करावा,’ अशी मागणी त्यांनी केली. ‘पुणेकर खड्ड्यांच्या समस्येने हैराण झाले असताना, महापालिकेने आकडेवारीच्या खेळातून बाहेर यावे. महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरावे आणि शहरातील जीवघेणे खड्डे तत्काळ बुजवावेत,’ असे ते म्हणाले.
प्रश्न न सुटल्यास आंदोलन करणार
शहरातील विविध भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचा साम्राज्य पसरलेले आहे. खड्डे पडलेल्या रस्त्यातून वाहने चालवताना वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पावसाने उघडी दिल्यानंतरही पडलेले खड्डे बुजवले जात नाहीत, याकडे प्रमोद भानगिरे यांनी लक्ष वेधले आहे. पुणेकरांच्या हितासाठी आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना कटिबद्ध असून महापालिका प्रशासनाने रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांबाबत निर्णय घेतल्यास रस्त्यावर उतरून आणि महापालिकेत येऊन शिवसेना पद्धतीने आंदोलन केले जाईल, असा इशारा देखील शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख भानगिरे यांनी दिला आहे.
