पुणे : शहरातील रस्त्यांची खराब स्थिती, त्यावर पडलेले खड्डे याची माहिती आता महापालिकेला तातडीने मिळणार आहे. यासाठी महापालिकेने ‘एथर एनर्जी’बरोबर करार केला आहे. ‘एथर’च्या ‘पॉटहोल प्लस अलर्ट’ तंत्रज्ञानाच्या मदतीने संकलित होणाऱ्या विदेच्या आधारे रस्त्यावरील खड्ड्यांची माहिती महापालिकेला मिळेल. यामुळे रस्ते दुरुस्तीसह खड्डे बुजविण्याचे काम महापालिकेला वेगाने करता येणार आहे.
‘पॉटहोल प्लस अलर्ट’ तंत्रज्ञानाच्या मदतीने रस्त्यातील अडथळ्यांची विदा संकलित केली जाते. त्यात रस्त्यावरील खड्डे, खराब भाग आणि असमान भाग याची माहिती महापालिकेला मिळेल. या माहितीच्या आधारे महापालिकेकडून कोणत्या ठिकाणी दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे, प्राधान्यक्रमाने कुठे दुरुस्ती करावी आणि भविष्यात तेथील रस्त्याची समस्या सोडविण्यासाठी अशा पातळ्यांवर पावले उचलली जातील. याचबरोबर कायम रस्त्यांवर समस्या होणारी ठिकाणे आणि भाग निदर्शनास येऊन महापालिका तेथे दीर्घकालीन उपाययोजना करू शकते. याविषयी महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम म्हणाले, ‘रस्त्यातील त्रुटींची माहिती वेळेवर मिळणे महत्त्वाचे आहे. त्यातून रस्त्यांची देखभाल कार्यक्षम पद्धतीने करता येईल आणि वाहनचालकांची सुरक्षितता आणखी वाढेल. या भागीदारीच्या माध्यमातून मिळणाऱ्या माहितीमुळे महापालिकेला दुरुस्ती आवश्यक असलेले रस्ते, कोणत्या रस्त्यांना प्राधान्य द्यायचे आणि वारंवार निर्माण होणाऱ्या समस्या यावर उपाययोजना करता येतील. तंत्रज्ञानाच्या मदतीने पुण्यातील रस्त्यांचे जाळे आणखी सुधारण्याचा आमचा प्रयत्न आहे.’
या भागीदारीबाबत ‘एथर एनर्जी’चे मुख्य व्यवसाय अधिकारी रवनीत फोकेला म्हणाले, ‘शहरांचा विस्तार होत असताना तंत्रज्ञान आणि विदेचा वापर आपण कशा प्रकारे करतो, हे दिवसेंदिवस महत्त्वाचे ठरत आहे. नागरी पायाभूत सुविधांचे नियोजन आणि त्यांची योग्य देखभाल आवश्यक आहे. आमच्या स्कूटरच्या माध्यमातून रस्त्यांवरील अडथळ्यांची माहिती चालकांना मिळते. आता ही माहिती पुणे महापालिकेलाही मिळेल. या तंत्रज्ञानामुळे केवळ वाहनचालकांचा प्रवास आरामदायी होणार नाही तर सुरक्षित रस्ते आणि नागरी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा शक्य होणार आहे.’
तंत्रज्ञान कसे काम करते?
‘पॉटहोल प्लस अलर्ट’मध्ये दररोज रस्त्यांवर धावणाऱ्या ‘एथर’च्या कनेक्टेड स्कूटरची विदा संकलित केली जाते. हे तंत्रज्ञान या विदेचे विश्लेषण करून रस्त्यांवरील नेमका अडथळा शोधते. त्यानंतर तेथून प्रवास करणाऱ्या स्कूटरचालकांना रस्त्यावरील अडथळ्याचा इशारा देण्यात येतो. महापालिकेला आता या तंत्रज्ञानामुळे रस्त्यांच्या अवस्थेची माहिती मिळणार असून, त्यांच्या दुरुस्तीकडे तातडीने लक्ष देणे शक्य होणार आहे.
