पुणे : शहरातील विविध रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे त्यामधून वाहने चालवताना नागरिकांचे कंबरडे मोडत आहे. रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्ड्यांचा सामना नागरिक एकीकडे करीत असताना ‘शहरात यंदा खड्ड्यांची संख्या कमी आहे,’ असा दावा महापौर मंजूषा नागपुरे यांनी केला.
नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रस्ता) वाहतूक कोंडीवरून पोलिसांना अहवाल देण्याचे आदेश देऊन सजगता दाखविणाऱ्या महापौरांनी दुसऱ्याच दिवशी शहरातील खड्ड्यांच्या समस्येवर केलेल्या या वक्तव्यामुळे आश्चर्य व्यक्त व्यक्त केले जात आहे
पुणे शहरातील अनेक महत्त्वाच्या रस्त्यांवर खड्ड्यांची चाळण झाली आहे. मनुष्यबळाअभावी प्रशासन हतबल असल्याची प्रतिक्रिया महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली. तसेच, महापालिकेचा पथ विभागातील कारभार याला जबाबदार असल्याचेही ते म्हणाले होते. तसेच, त्यांनी कडक शब्दांत प्रशासनातील अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली होती.
रस्त्यांवर पडलेले खड्डे दुरुस्त करण्यासाठी पथ विभागाने जोर लावला असून अधिक गतीने काम करून रस्तेदुरुस्ती केली जात आहे. रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे पथ विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी पथ विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे.
एकीकडे हे चित्र असताना शहरात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खड्ड्यांची संख्या कमी असल्याचे महापौर मंजूषा नागपुरे यांनी म्हटले आहे. महापौर नागपुरे यांच्या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शहरात जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले असताना शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौर मंजुषा नागपुरे यांना खड्डे दिसत नसतील आणि रस्त्यावर खड्डे कमीच असल्याचा दावा त्या करत असतील तर महापौर नक्की कोणत्या रस्त्यावरून प्रवास करतात, अशी विचारणा महापालिकेचे विरोधी पक्षनेते निलेश निकम यांनी केली आहे.
शहरातील खड्ड्यांबाबत महापौर नागपुरे यांनी केलेल्या डाव्यावर महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते रामचंद्र उर्फ चंदू कदम यांनीही टीका केली आहे. ते म्हणाले, शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे पुणेकर त्रस्त झाले आहेत. खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होते. त्यामध्ये वाहनचालक तासन्तास अडकून पडतात. रस्त्यांवर पडलेले खड्डे दुरुस्तीसाठी प्रशासनावर वचक ठेवायचा सोडून यंदा खड्डे कमी, असे वक्तव्य करणे म्हणजे पुणेकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. खड्ड्यांच्या प्रश्नावरील जबाबदारी झटकण्याचा महापौर प्रयत्न करीत आहेत.
खड्ड्यांकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष
महापालिकेत भारतीय जनता पक्ष सत्ताधारी पक्ष म्हणून काम करत आहे. पावसामुळे तसेच प्रथ विभागाच्या दुर्लक्षामुळे अनेक भागातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झालेली आहे. वाहतुकीचा वेग मंदावला असल्याने सकाळ संध्याकाळ वाहतूक कोंडी होते. पुणेकरांनी भाजपवर विश्वास ठेवून सलग दुसऱ्यांदा बहुमत दिले. पण रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवर महापालिकेतील एकही पदाधिकारी चकार शब्द काढण्यास तयार नसल्याने गाऱ्हाणे मांडायचे तर कोणाकडे? असा प्रश्न विचारला जात आहे.
