पुणे : शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांना महापालिकेचा पथ विभागाचा ढिसाळ कारभार जबाबदार असल्याची कबुली महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असताना महापालिकेतील अनेक कर्मचारी, अधिकारी मतदारयाद्यांच्या ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ कामात अडकल्याने मनुष्यबळाअभावी प्रशासन हतबल असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
शहरात गेल्या महिनाभर पडलेल्या पावसाने रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. सर्वत्र खड्डे आणि रस्ते खराब झाले असून, रस्ते नीट करण्याचे कामदेखील अत्यंत संथ सुरू आहे. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी महापालिकेत बैठक घेतली. पथ विभागाच्या अधिकाऱ्यांची कडक शब्दांत खरडपट्टी काढली. त्यानंतर उपस्थित पत्रकारांशी बोलताना ‘रस्त्यांवर खड्डे पडण्यासाठी पथ विभागाचा ढिसाळ कारभार जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले.
पथ विभागातील अधिकारी खोदलेले रस्ते व्यवस्थित बुजविले जात आहेत की नाही? याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात रस्त्यांची डागडुजी केली जाते,’ असे ते म्हणाले.
‘पावसामुळे तसेच विविध कंपन्यांनी खोदलेले रस्ते योग्य पद्धतीने बुजविण्यात न आल्याने रस्ते पुन्हा खराब होत आहेत. त्यातच गेल्या महिन्यापासून मतदार याद्यांच्या ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ करण्याचे काम सुरू आहे. यासाठी महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांना कामे दिली आहेत. त्यामुळे महापालिकेत मनुष्यबळाची कमतरता आहे. हे काम पूर्ण करण्यामध्ये कर्मचारी अडकल्याने प्रशासन हतबल आहे,’ असे आयुक्त राम यांनी सांगितले.
‘यंदा पावसाळा सुरू होण्यापूर्वी विविध प्रकल्पांच्या कामासाठी रस्ते खोदण्याची परवानगी देण्यात आली. महापालिकेच्या पाणीपुरवठा, मलनिस्सारण, विद्युत विभागांनीदेखील कामे करण्यासाठी रस्त्यांची खोदाई केली. मात्र, ही कामे करताना महापालिकेच्या विभागांनी एकमेकांशी संवाद न ठेवता परस्पर रस्त्यांची खोदाई केली. काम झाल्यानंतर खोदलेले रस्ते, पदपथ व्यवस्थित दुरुस्त करण्यात आले नाहीत.
परिणामी शहरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवरदेखील मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत,’ अशी कबुली आयुक्त राम यांनी दिली. ‘रस्त्यांवर पडलेले खड्डे तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश राम यांनी दिले असून, एका महिन्यात सर्व खड्ड्यांची दुरुस्ती पूर्ण केली जाईल,’ असे त्यांनी सांगितले.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम म्हणाले, रस्ते खोदल्यानंतर ते बुजविताना समपातळीवर आणले नाहीत. पावसाळी गटारे नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यात मुरते आणि रस्ते खचतात. त्यावर खड्डे पडतात. खड्डे पडलेले रस्ते दुरुस्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एका महिन्यात सर्व खड्डे बुजविले जातील.
आठ हजार चौरसमीटर खड्डे बुजविले
महापालिकेने गेल्या काही दिवसांंमध्ये कोल्डमिक्स, हॉटमिक्स डांबर आणि अन्य तंत्रज्ञान वापरून शहरातील सुमारे आठ हजार चौरस मीटर क्षेत्रफळातील खड्डे बुजविले असल्याचा दावा अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी केला. पाऊस असेल, तर कोल्डमिक्स आणि पाऊस नसेल, तर हॉटमिक्सचा वापर केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
