पुणे : पुणे महापालिकेच्या पथ विभागाला सध्या रस्त्यांची दुरवस्था दिसत नाही का, असा सवाल खड्ड्यांत आदळणाऱ्या प्रत्येक वाहनचालकाच्या मनात सध्या उमटतो. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर असताना, ते जाणार असलेल्या मार्गावरील खड्डे दुरुस्त करण्यासाठी युद्धपातळीवर काम होते, तर सामान्य पुणेकरासाठी का होत नाही, असा प्रश्नही पडतो. आणि, शहरातील रस्ते नीट होण्यासाठी सर्व रस्त्यांवर ‘व्हीआयपीं’ना आमंत्रित करण्याची वेळ आल्याची खास ‘पुणेरी’ भावनाही व्यक्त होते.

शहरात जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाला. ‘नेमेचि येतो…’ या पावसाला लागू पडणाऱ्या उक्तीप्रमाणेच ‘नेमेचि पडतात खड्डे’ हे स्वरूपही यंदाही कायम आहे. ठिकठिकाणी खड्डे, रस्त्यांवर अपघातांना निमंत्रण मिळतील अशा डांबरी, काँक्रिटी मलमपट्ट्या, रस्त्यांची एकसलगता कायम न ठेवणे असे चित्र शहरभर आहे. ‘‘व्हीआयपीं’साठी आणि गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी ज्या दर्जाचे रस्ते पुणेकरांनी भरलेल्या करांतून तयार केले गेले, तसे रस्ते या करदात्यांसाठी कायमचे केव्हा केले जाणार, हा प्रश्न पावसाळ्यातील या नित्य समस्येमुळे पडतो,’ असा संताप मध्यवर्ती भागातील एका नागरिकाने व्यक्त केला.

शहरातील प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. वर्दळीच्या सर्वच रस्त्यांची अवस्था भीषण आहे. कर्वे रस्त्यावर आबासाहेब गरवारे महाविद्यालयाजवळील चौकात चेंबरच्या झाकणाची लोखंडी टोकदार पट्टी त्यावरून जाणाऱ्या सर्व वाहनांच्या टायरचा दर्जा तपासत आहे! डेक्कन कॉर्नरजवळ चेंबरच्या झाकणांभोवतीचे खड्डे काहीच दिवसांपूर्वी दुरुस्त केले होते. महिनाभराच्या पावसाने त्यांचीही पुन्हा चाळण झाली आहे. बांधकाम प्रकल्पांमधून गोळा केला जाणाऱ्या राडारोड्याला पावसामुळे चिखलाचे रूप आले आहे. डंपरमधून हा चिखल घेऊन जाताना रस्त्यांवर तो जागोजागी पडून अपघाताला आमंत्रण मिळत आहे.

वर्दळीच्या आपटे रस्त्यावर सांडपाणी वाहिन्यांच्या कामांसाठी खोदलेला डांबरी रस्ता सिमेंटने बुजवला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंना डांबरी रस्ता आणि मधून सिमेंटच्या रस्त्याची पट्टी तयार झाली आहे. रस्त्याची सलगता बदलल्याने अपघाताचा धोका आहे. गेल्या महिन्यात झालेल्या पावसात या ठिकाणी असलेल्या चेंबरमधून सांडपाणी रस्त्यावर येत होते आणि वाहने त्यामधून मार्ग काढत होती.

सिमेंटच्या रस्त्यावर काही भाग पेव्हर ब्लॉकने जोडलेला असतो. अनेक ठिकाणी हे पेव्हर ब्लॉक उखडले आहेत. बीएमसीसी रस्त्यावरील पेव्हर ब्लॉकची ही अवस्था लक्षात येते. पुणे स्टेशन, मालधक्का आदी ठिकाणी असेच चित्र आहे. शहरातील रस्त्यांवरच हे चित्र आहे, असे नव्हे, तर मुंबई–बंगळुरू महामार्गालगत असलेल्या सेवा रस्त्यांचीही अवस्था बिकट आहे. वाकड ते आंबेगाव-कात्रजदरम्यानचे सेवा रस्ते खड्डे आणि पाण्याने भरलेल्या डबक्यांमध्ये बदलले आहेत. पावसात हे रस्ते ओढे-नाल्यांसारखे वाहू लागतात. त्यामुळे वाहनचालक सेवा रस्ते टाळून थेट महामार्गावरून प्रवास करता. अपघाताचा धोका त्यामुळे वाढला आहे. खड्ड्यांमुळे पाठीच्या मणक्याचे त्रासही उद्भवू शकतात.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी काही दिवसांपूर्वीच अत्यावश्यक कामांशिवाय रस्ते खोदाईला परवानगी देऊ नये, तसेच पाणीपुरवठा, ड्रेनेज, वीज वाहिन्या आणि इतर कामांसाठी खोदलेले रस्ते तातडीने पूर्ववत करण्याचे स्पष्ट आदेश प्रशासनाला दिले. मात्र, या आदेशाची अंमलबजावणी किती गांभीर्याने शहरभर झाली, याचे वास्तव जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमध्ये आणि मूळ रस्त्याची पातळी सोडून अनेक ठिकाणी वाट्टेल तसे बुजविलेल्या खड्ड्यांवरून समोर आले आहे. ऐन पावसाळ्यातही अनेक ठिकाणी खोदाई होत असल्याचे चित्र आहे. तसेच, खोदलेले रस्ते आणि पदपथ निकृष्ट पद्धतीने बुजविल्याने काही दिवसांतच पुन्हा उखडल्याचे पाहायला मिळत आहे.

रस्त्यांची दयनीय अवस्था कुठे?

शहरातील मध्यवर्ती पेठांचा भाग असलेल्या कसबा पेठ, रविवार पेठ, मंगळवार पेठ, कोथरूड भागातील परमहंस नगर, अण्णाभाऊ साठे चौक, एसएनडीटी परिसर, पौड रस्ता, कोथरूड डेपो, आंबेगावमधील दत्तनगर चौक, जांभुळवाडी रस्ता, नऱ्हे रस्ता, शिवसृष्टी परिसर, सिंहगड कॉलेज परिसर, वडगाव बुद्रुक, राजस सोसायटी, सातारा रस्ता, मांगडेवाडी, कात्रज-कोंढवा रस्ता, येवलेवाडी, बावधन, बाणेर, बालेवाडी, औंध, चांदणी चौक ते वारजे सेवा रस्ता, रामनगर ते दांगट इंडस्ट्रियल परिसर अशा भागातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. काही भागांमध्ये रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असल्याचे चित्र दिसत आहे.

कोट्यवधीच्या खर्चाचे होते काय?

खड्डेदुरुस्ती आणि रस्त्यांवर महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र, खड्ड्यांची समस्या कायम आहे. हे पैसे नेमके जातात कुठे, रस्ते आणि खड्डे बुजविणे यांवर नेमकी कोण देखरेख ठेवतो आणि निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्यांवर नेमकी काय कारवाई होते, हे अधिकाऱ्यांनी स्पष्ट करावे, अशी मागणी सामान्य नागरिकांतून होत आहे.