पुणे : भूमिगत वाहिन्या, गटारांच्या कामांसाठी सुरू असलेले खोदकाम. त्यात पावसामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डेच खड्डे. शहरभर सध्या असे चित्र आहे. खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. वाहतूक कोंडीने आधीच त्रस्त असलेल्या पुणेकरांना त्यामुळे मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
शहरातील वेगवेगळ्या भागांत भूमिगत जलवाहिन्या, सांडपाणी वाहिन्या, वीजवाहिन्या, दूरसंचार वाहिन्या, तसेच अन्य कामांसाठी रस्ते खोदण्यात येत आहेत. त्यामुळे आधीच अरुंद असलेले रस्ते आणखी आक्रसत आहेत. खोदकामांमुळे निर्माण झालेला राडारोडा, बांधकाम साहित्याचा ढीग रस्त्यांच्या कडेला, अधे-मधे कुठेही पडलेला दिसतो. त्यामुळे आधीच अरुंद रस्ते आणखी आकुंचन पावतात.
काम संपल्यानंतर रस्ता मूळ स्थितीत आणण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाची असते. प्रत्यक्षात मात्र अनेक ठिकाणी केवळ माती, सिमेंट आणि खडी भरून अर्धवट काम केले जाते. त्यात रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचते. पाण्यामुळे खड्डे दिसत नाहीत. खडी-माती टाकून बुजवलेल्या खड्ड्यांवरून वाहने घसरतात. खोदकाम, खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण होते, गाड्या घसरून अपघात होतात. हा अनुभव दररोज वाट्याला येतो, अशी तक्रार नागरिकांकडून केली जाते.
खड्डे बुजविण्यासाठी नियम ठरविण्यात आले आहेत. काम करणाऱ्या कंत्राटदाराचे नाव, ते कधी पूर्ण होणार, त्यासाठी किती रुपये खर्च करण्यात आले आदी माहिती असलेले फलक कामाच्या ठिकाणी लावणे गरजेचे असते. मात्र, हे सगळे नियम केवळ कागदावरच दिसतात. प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी होत नाही. या नियमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेली महापालिका, वाहतूक पोलीस, सरकारी आस्थापना आणि त्यांना प्रश्न विचारण्याची जबाबदारी असलेले नगरसेवक, लोकप्रतिनिधी या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचेही नागरिकांकडून सांगण्यात येते.
रस्त्यांवरचे खड्डे, खोदकामानंतर न बुजवलेले रस्ते हे दर वर्षीचे प्रश्न कधी सोडवणार? ते सोडविण्यासाठी पुणे महापालिका काही करणार आहे, की नाही ? – हर्षद अभ्यंकर, अध्यक्ष, सेव्ह पुणे ट्रॅफिक मूव्हमेंट
रस्ते बुजविण्याची कामे क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून करण्यात येत आहेत. त्यासाठी त्यांना निधी उपलब्ध करून दिला आहे. क्षेत्रीय कार्यालयांकडून या कामांसाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. – राजेश बनकर, पथ विभागप्रमुख, पुणे महापालिका
tushar.suryawanshi@expressindia.com
तुम्हीही पाठवू शकता अनुभव
दररोजच्या जीवनात तुम्हाला जाणवणाऱ्या समस्या, प्रश्न, प्रशासनाकडून अपेक्षा याबाबत तुमचे अनुभव ‘लोकसत्ता’कडे पाठवू शकता. यामध्ये आवश्यक असलेल्या उपाययोजनादेखील नागरिक सुचवू शकतात. यातील महत्त्वाच्या पत्रांची दखल घेऊन त्याला ‘लोकसत्ता’च्या ‘तगादा’ सदरामध्ये प्रसिद्धी दिली जाईल. ई-मेल आयडी : lokpune4@gmail.com
